
मी इंजिनीअर आहे, संशोधक आहे, शास्त्रज्ञ आहे. वैज्ञानिक पद्धतीचा पुरस्कार करणारा चिकित्सक बुद्धिवादी आहे. इंजिनीअरिंगच्या दहा क्षेत्रात मी सक्रिय संशोधन केले आहे. त्याची जागतिक स्तरावरसुद्धा दखल घेतली गेली आहे आणि तरी मी ‘रुद्राक्ष बाबा’ या नावाने जगभरात प्रसिद्ध आहे. यात बऱ्याच जणांना विरोधाभास दिसेल पण ते तसं नाही. ज्ञान आणि बुद्धी अध्यात्म आणि विज्ञान यांच्या शास्त्रशुद्ध संगमामुळेच रुद्राक्ष बाबा प्रसिद्ध आहे. परमेश्वर दूर अध्यात्माच्या आणि विज्ञानाच्या मार्गावर ज्या रुद्राक्षाला आजकाल फार महत्त्व प्राप्त झालं आहे त्या रुद्राक्षाचं उदाहरण घेऊया. आज त्या रुद्राक्षांसाठी लोक माझ्यापर्यंत येतात पण मी कसा पोहोचलो त्या रुद्राक्षांपर्यंत?
मला नेपाळमध्ये एका स्पिनिंग मिलचं काम मिळालं होतं. माझ ते क्लाएंट नेपाळ मधील एक श्रीमंत उद्योजक होते. त्या दरम्यान मी दोन वर्षांत २६ वेळा नेपाळला गेलो होतो! मुंबई विमानतळावर माझं तिकीट काढून ठेवलेलं असायचं. सायंकाळी पाचच्या विमानाने मी काठमांडूला जायचो. दुसऱ्या दिवशी साईटवर काम करायचे. जेवायला त्या उद्योजकाच्या घरी जायचो. घरी त्याच्या आईशी गप्पा करायचो. बोलता बोलता मी एके दिवशी त्यांना मी कैलास मानसरोवर यात्रा केल्याचं सांगितलं. मोठा उसासा सोडत त्या म्हणाल्या, ‘बेटा! मै भी कैलाश दर्शन जाना चाहती थी. पर…”असं म्हणून त्यांनी पुन्हा एक दीर्घ श्वास सोडला. थोड्या वेळाने म्हणाल्या,’ क्या तुम मुझे इस यात्रा के बारे मे बताओगे?’
मी त्यांना सविस्तरपणे कैलास यात्रेचे वर्णन सांगितले. त्यांना खूपच आनंद झाला. मी नाशिकला परत यायला निघालो. त्यांचा नमस्कार केला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘बेटा शिवजीकी कृपा है तुझ पर, मैं शिवजीका प्रसाद आशीर्वाद के रुप में, रुद्राक्ष के पौधे भेट दुँगी! मला रुद्राक्षाच्या झाडांबद्दल काही जास्त माहिती नव्हती. पण प्रभुचे प्रतीक स्वरूप रुद्राक्षाची अकरा रोपे आशीर्वाद म्हणून मिळाल्याने प्रचंड आनंद झाला. प्रत्येकी एक फुटाची ती अकरा रोपे घेऊन काठमांडू विमानतळावर आलो. तर तेथे वेगळच नाटक सुरू झालं. विमानतळ अधिकारी ती रोपे बाहेर नेण्यास परवानगी नाही म्हणून अडून बसली! आमचे क्लायंट नेपाळमधील श्रीमंत व परिचित होते. मी त्यांना फोनवर सांगितल्यावर त्यांनी विमानतळ अधिकाऱ्यांशी बोलून मला रोपे घेवून जाण्याची परवानगी मिळवून दिली, पण एका अटीवर. ही रोपे विमानात ठेवता येणार नाही! म्हणजे? मी चक्रावलो! विमानात ठेवता येणार नाहीत म्हणजे काय? मग काय विमानावर ठेवायची का? पुन्हा वाद झाला. अखेर ती रोपे मी मांडीवर घेऊन बसलो. एखाद्या लहान बाळासारखे जपत मी ती अकरा रापे काठमांडूहून मुंबईला आणली. असा तोडगा निघाला आणि काठमांडूहून विमानात त्या अकरा रोपाचे पार्सल लहानग्या बाळासारखे सांभाळत मुंबईला पोहोचलो! मुंबई विमानतळावर रुद्राक्षरोपांचा भारतीय अंक सुरू झाला!
मुंबईतील विमानतळ अधिकारी ती रोपे बाहेर आणू द्यायला तयार नव्हते. पंधरा दिवस विलगीकरणात (क्वारन्टाइन) ठेवावी लागतील, त्यांच्यामार्फत काही बुरशी किंवा विषाणू नाही ना आले याची तपासणी करावी लागेल, असं त्यांच म्हणणं होतं. मग मात्र मी शंकराचं ‘भोले’ रूप सोडून ‘तांडव’ रूप धारण केलं. तांडव पाहून अखेर वैतागून ते अधिकारी म्हणाले, ‘ओ बाबा, जा निघा.’ तांडव रुपातून मी सौम्यरुपात आलो. नाशिकला पोहोचलो. पण पुढे या रोपांचं काय करायचं तेच कळेना.
झाडांबद्दल काहीच माहिती नव्हती, आणि ही तर रुद्राक्षाची रोपं! परक्या भूमीतील, परक्या वातावरणातील, या अनोळखी मातीत कशी आणि कुठे रुजवायची? तेच समजेना. अखेर अज्ञानातच सुख असते त्याप्रमाणे मी आमच्या मावशींना सांगितले, मावशी, ही रोपं लावून टाका! आमच्या मावशी पण आमच्या सारख्याच या विषयातील ‘तज्ज्ञ’! त्यांनी माझे ऑफीस व घर या पंधरा फूट अंतरातील जागेवर जवळ जवळ चार रोपं लावून टाकली. पाचवे थोडे बाजूला लावले. तरी सहा रोपे उरली होती! मग माझी सासरवाडी सटाणा येथे, उंबरखेडला, चाळीसगावला आणि नगरला देऊन दोन रोपे नाशिकमध्ये दिली. पण दिलेल्या सहा रोपांपैकी एकही रोप जगलं नाही! मात्र आमच्या मावशींनी भोळ्या भावभक्तीने लावलेली पाचही रोपे जगली! या गोष्टीला आता २५ वर्षे झाली. त्या झाडांना काधीही खत, औषध असलं काही टाकले नाही. फक्त नित्यनेमाने पाणी दिलं जात होतं. आता ही पाचही मोठी रुद्राक्षाची झाडे आता आमच्या आयुष्यावर आध्यात्मिक आणि आरोग्यपूर्ण सावली धरून आहेत! काठमांडूच्या त्या माताजी म्हणाल्या होत्या त्याप्रमाणे खरोखर ‘शिवजी की कृपा’ माझ्यावर असल्यामुळेच ‘शिवजी का प्रसाद’ मला पावन झाला. कैलास-मानस यात्रेत जे काही पुण्य कमावले आणि नंतर आठ-दहा वर्षे ते ज्ञान इतर गरजू भाविकांना मोफत मार्गदर्शन केले त्यामुळेच हे शक्य झाले असे मला वाटते!
आता आमच्या बंगल्याच्या आवारातील हे पाच रुद्राक्षाची मोठी वृक्ष पाहण्यासाठी अनेक जण येतात. ऋषी-मुनी, संत साधू, जिज्ञासू, अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, संशोधक, भाविक मंडळी येतात. शेकडो लोकांचे शेकडो पातळीवरचे विविध अनुभव आहेत. ‘शिवजी का प्रसाद’ लोकांच्या, समाजाच्या उपयोगी पडत आहे यातच आम्हाला समाधान आहे!

पुढे चालून माझ्यातील संशोधकाने मग या झाडांचे संशोधन सुरू केले. त्यानिमित्ताने फार्मास्युटिकल इंजिनीअरिंग क्षेत्रात मला संशोधन करता आलं. साधारणपणे ५० ते ७० फुटापर्यंत यांची वाढ होते. खोड एक मीटरपर्यंत रुंद असते. पाने आंब्याच्या पानांसारखी असतात. सुरुवातीला पाने फिकट हिरवी असतात. नंतर गडद हिरवी आणि नंतर पिवळी लाल होऊन पानगळीच्या वेळी कॉफी रंगाचे होतात. साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात झाडावर पांढरे शुभ्र फुलांचे घोसचे घोस दिसू लागतात. रात्री हलकासा सुगंध वातावरणात दरवळतो. त्यानंतर बरोबर महिनाभराने फळं दिसू लागली. रोपे लावल्यापासून सहाव्या वर्षी पहिल्यांदा झाडाला फळे लागली होती. पहिल्या वर्षी मोजून एकवीस फळे लागली होती. या फळाचं काय करायचं याबद्दल आम्हाला काहीचं माहिती नव्हती. फळ हिरव्या रंगाचे आणि सामबोरासारखे होते. ते फळ पिकल्यावर निळ्या जांभळ्या रंगाचे बनले. पिकलेले रुद्राक्ष जमिनीवर गळून पडू लागली. फळाच्या बाहेरील कवच आणि गर काढल्यावर आत कडक दाणा/मणी मिळतो. शर्मिष्ठा व आमच्या मावशी कित्येक वर्षांपासून नित्यनियमाने व्रतासारखे मनोभावे हे काम करत आली आहेत. रुद्राक्षावर बाहेरून जितक्या रेषा, खाचा दिसतील तितक्या मुखी तो असतो. एक मुखीपासून २१ मुखीपर्यंत रुद्राक्ष असतो. रुद्राक्षाचे आध्यात्मिक महात्म्य तर सर्वच पोथ्या पुराणात वर्णीले आहे. पण मी त्यांचा वनस्पतिशास्त्राच्या अंगाने आणि फार्मास्युटिकल इंजिलनीअरिंगच्या अंगाने जास्त अभ्यास केला आहे. खरा रुद्राक्ष जड असल्याने तो पाण्यात बुडतो व ही त्याच्या खरेपणाची एक कसोटी आहे. पण काही रुद्राक्ष हे पक्षाने कुरतडलेले, अर्धवट खाल्लेले किंवा उन्हाने वाळलेले किंवा अर्धेकच्चे खाली पडलेले असे रुद्राक्ष हा पूर्णपणे पिकत नाही. त्यामुळे त्याच्यात रुद्राक्षाचे खरे गुण येत नाहीत. अशा अर्धवट रुद्राक्षाना भद्राक्ष म्हटले जाते. रुद्राक्षाचा मुख्य गुण म्हणजे ते आपल्याला निर्भय बनवतो. ऊर्जा मापन करणारी यत्रे नोंदवतात की रुद्राक्षात एक प्रकारची विद्युतशक्ती आणि ध्वनी असतो. रुद्राक्ष धारण करणे म्हणजे आज आपल्याभोवती वातावरणात सर्वत्र असलेल्या विविध ऊर्जा रेडिओ विद्युत तरंगापासून बचाव करण्याची ढाल आहे. रुद्राक्ष दाण्यांचा सूक्ष्म ॲक्युप्रेशर उपचार तंत्रातही उपयोग केला जातो. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्मरणशक्ती या साठी उपयोगात आणला जातो. तसेच केशवर्धन, सौंदर्यप्रसाधन आणि सुरकुत्या नष्ट करण्यासाठीसुद्धा रुद्राक्ष उपयोगी ठरतात.
प्रयोग करण्यासाठी एकदा मी एक रुद्राक्ष फोडला. आतील सफरचंदासारखी चपट बी जमिनीत लावली. विविध पुस्तके अभ्यासली. पण यश आले नाही. नाशिक येथील मुक्त विद्यापीठातील कृषी संशोधक डॉ. श्री सूर्या गुंजाळ यांचे मार्गदर्शन घेतले. ८३ कलमे तयार केली. कलमाला मुळं फुटली. त्यातील वीस-बावीस जगली. त्यातील सात रोपे चेन्नईला नेली. तेथे लावली. पण एकही जगले नाही. तिसऱ्या वर्षी अचूक प्रयोगानंतर एक रोप जगले. ते झाड आता नेर्लीकर हॉस्पिटल, गंगापूर रोड, नाशिक येथे वीस ते पंचवीस फूट उंचीचे झाले आहे.
गेल्या पंचवीस-तीस वर्षांत शेकडो लोक रुद्राक्षाच्या झाडांना भेटी देऊन गेलेत. मी सुद्धा हजारो लोकांना भेट प्रसाद म्हणून रुद्राक्ष दिले आहेत. कधीही रुद्राक्ष विकले नाही. श्रद्धा भावनेचा व्यापार केला नाही. अनेक साधू-संन्यासी येतात. संत-महात्मे येतात. झाडाजवळ जातात. थांबतात. पूजा करतात. अभिषेक करतात. जाताना आम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. एके दिवशी भल्या पहाटे जुनागढचे संत आले होते. ते सरळ रुद्राक्षाच्या झाडाजवळ गेले. तेथे मंत्रोपचार करून पूजा केली. त्यानंतर घरात येवून त्यांनी आमच्याकडे ११ रुद्राक्ष मागितले. मंत्रोपचार करून ते रुद्राक्ष त्यांनी आम्हाला परत दिले व देवघरात ठेवण्यास सांगितले.

आमच्या घरी माझे भारतीय मित्र त्यांच्या अमेरीकन बायको सोबत आला होता. त्यांची पत्नी अनामिक ओढीने रुद्राक्ष वृक्षाकडे आकर्षित झाली. झाडाखाली उभी राहिली, बराच वेळ झाला तरी ती तेथून हलायलाच तयार नाही! तिची भावसमाधी लागली होती. आमच्या हाकाही तिला ऐकू आल्या नाही आणि अनामिक स्पंदनांनी संपूर्ण शरीर थरथरत होतं! थोड्या वेळाने ती म्हणाली, मी या जगात नव्हतेच..!
असाच एक दुसरा अनुभव. अमेरीकेतील एक भारतीय महिला आमच्याकडे आल्या. रुद्राक्षाच्या झाडाखाली बसून ध्यानस्थ झाल्या. एक ते दीड तासानंतर आम्ही त्यांना विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘मी जमिनीपासून पाच ते सात फुट उंचीवर तंरगत होते.’ असे अनेक आश्चर्यकारक अनुभव आहेत.
तर मला ‘रुद्राक्ष बाबा’ म्हणून घडवण्यात चेन्नईच्या शिव शंकर बाबांचे फार मोठे श्रेय आहे. कैलास मानस यात्रेची सुरुवात झाल्यानंतर ग्रुपमधील लोकांशी ओळख व्हायला लागली. त्या ग्रुपमध्ये चैन्नई येथील शिवशंकर बाबा म्हणून एक सिद्ध योगी पुरुष अनेक शिष्यांना बरोबर घेऊन आले होते. रोज संध्याकाळी कॅम्पवर पोहचल्यावर शिवशंकर बाबा त्यांच्या अनुयायांसोबत प्रार्थना व हवन करीत असत. बाबांचे एक शिष्य कृष्णा एरोनॉटिकल इंजिनीअर होते. रमेशभाई अकाउंटंट होते. आम्हीदेखील सर्वांमध्ये मिसळून गेलो. यात्रा संपल्यानंतर शिवशंकर आश्रमाशी माझा ऋणानुबंध जास्त घट्ट झाला. आश्रमातून फोन यायचा ‘आपको याद किया है’ मी लगेच चेन्नईला निघायचो. शिवशंकर बाबा म्हणजे फार मोठे प्रस्थ होते. ते मद्रास पोर्ट ट्रस्टमध्ये मॅनेजमेंट सल्लागार होते. ट्रान्सपोर्टचा मोठा व्यवसाय होता. त्यांचं लग्न झालेलं होतं. मुलाबाळांचा भरलेला संसार एका परिवर्तनाच्या क्षणी सर्व सोडून चेन्नईपासून ३८ किलोमीटरावर पाँडिचेरी रस्त्याला कैलैमबक्कम या गावी आश्रम निवासी झाले. आम्हा दोघांवर बाबांचे विशेष प्रेम. ‘ये सब आखिर आपको ही सब संभालना है, आप दोनों को यही पर आना है’ असे ते नेहमी म्हणत. लोक त्यांना देव समजतात. आम्ही त्यांना मित्र व मार्गदर्शक समजतो. त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे मी रुद्राक्ष सेवा करत आलो. अनेक लोक येतात. रुद्राक्षाच्या वृक्षाजवळ जातात. त्यांना विविध अनुभव येतात. कुणाला पाण्याचा झुळझुळ नाद ऐकू येतो. कुणाला मंद सुगंध जाणवतो. मी कोठेही कार्यक्रमाला, परदेश प्रवासाला बाहेर निघालो की सोबत रुद्राक्ष आवर्जून घेतो. त्या त्या ठिकाणच्या लोकांना प्रसाद भेट देतो. मी दिलेले असे हजारो रुद्राक्ष अनेक घरात आज नित्य पूजेत आहेत. ते लोक आमची रोज आठवण काढत असतात.
२००५ साली बेंगळुरूला स्ट्रक्चरल इंजिनियर वर्ल्ड कॉन्फरन्स साठी गेलो होतो. दोन हजार प्रतिनिधी उपस्थित होते. एक चिनी वक्ता त्यांच्या देशातील पवन ऊर्जा संशोधन प्रगतीबद्दल बढाया मारत होते. स्टेजवरून संस्थेचे प्रेसिडेंट उमेश राव यांनी उभे राहून त्यांना सांगितले की, तुमच्या संशोधनापेक्षाही पवन ऊर्जा क्षेत्रातील जागतिक उच्चांकाची पवनचक्की बनवलेले अविनाश शिरोडे आज आपल्यात उपस्थित आहेत! सर्वांना अभिमान वाटला. टाळ्यांच्या गजरात माझे स्वागत झाले. मी त्या चिनी संशोधकाला आणि एका जर्मन वक्त्याला रुद्राक्षांचा मोमेन्टो, रुद्राक्षांची माळ बनवलेली दिली.

जेवणानंतर त्यांनी अजून रुद्राक्ष मागितले. आठ दिवसांनी त्यांनी ई-मेल पाठवला. एक रुद्राक्ष आणि एक रत्न अशी माळ बनवलेले फोटो त्यांनी पाठवले. डिसेंबर २०१७ साली इस्त्राइलमध्ये हाइफा येथे गेलो होतो. तेथे ज्यांच्या घरी राहिलो त्यांनाही रुद्राक्ष दिले. त्या माऊलीने तीन-तीन रुद्राक्षांची कानातील इयरिंग केले आणि आम्हाला तो फोटो पाठवला. वर्षातून एकदा या झाडाला बहर येतो पण २००७ दरम्यान एक वेगळाच अनुभव आला. तो म्हणजे नेहमीप्रमाणे नोव्हेंबरमध्ये फुले येऊ लागली. डिसेंबर-जानेवारीत फळधारणा झाली. त्यावेळी पुन्हा दुसऱ्यांदा फुले लागली. पहिल्या बहाराची फळे मोठी होत असताना दुसऱ्या बहराची फळधारणा सुरू झाली. ती फळे मोठी होत असताना तिसरा फुलांचा बहार आला आणि त्याची फळे मोठी होऊ लागली. एकाच वेळी काही अंतराने तीन बहाराची फळे झाडावर होती. मग पहिल्या बहाराची फळे पूर्णपणे खाली आल्यानंतर पुन्हा चौथ्या बहराची फुले आली. यावर एबीपी माझा चॅनेल म्हणजेच त्यावेळचे अल्फा मराठी चॅनेलने ग्लोबल वॉर्मिंग हा विषय घेऊन डॉक्युमेंटरी तयार केली होती. ही झाडे हिमालयात, विशेषत नेपाळमध्ये जास्त असल्याने नेपाळ भारत बॉर्डर गोरखपूरला अशी अनेक झाडे आहेत. इंडोनेशिया, फिलिपाइन्स येथे बरीच झाडे आढळतात. रुद्राक्षाचे अनेक प्रकार आहेत. त्यात नेपाळ रुद्रांक्ष बहुतांश पूर्ण गोल असतो. हा सगळ्यात जास्त उच्च प्रतिचा असतो आणि आमच्याकडे तीच झाडे आहेत. नाशिक, महाराष्ट्र भागात रुद्राक्षाचे झाड अति दुर्मिळ आहे. आणि थंड प्रदेश सोडून इतरत्र रुद्राक्षाचे झाड सहसा दिसत नाही. पण भोले शंकराच्या कृपा आशीर्वादामुळे आमच्याकडे ती झाडे लागली. याला आम्ही कैलास-मानस यात्रेतून मिळालेल्या पुण्यामुळे ही झाडे लागली अशी आमची भावना व श्रद्धा आहे.
जवळजवळ सर्व टीव्ही चॅनलवर रुद्राक्षसंदर्भात माझ्या मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. लोक सहाजिकच विचारतात तुम्ही इतक्या रुद्राक्षांचे काय करता? लोकांकडे ज्वारी, बाजरी, गव्हाच्या कोठ्या भरलेल्या असतात. आमच्याकडे रुद्राक्षाच्या कोठ्या भरलेल्या आहेत. या सगळ्या लेख मुलाखतीमुळे लोक लांबून लांबून शोधत आमच्याकडे येतात. रुद्राक्ष झाडाचे दर्शन घेतात. पूजा करतात. हे नेहमीचेच झाले आहे. पण कधीकधी त्याचा त्रासही होतो. आम्ही कधीही कोणाला नाही म्हटले नाही. त्या-त्या वेळी जशी प्रेरणा मिळेल तसे पाच, सात, अकरा, एकवीस किंवा मूठभर रुद्राक्ष देत असतो. आलेल्या बायकांची आपल्या पद्धतीने रुद्राक्षाची ओटी भरतो. विज्ञान संशोधनाच्या आणि सेमिनार च्या निमित्ताने आम्ही जगभर फिरत असतो. प्रत्येक वेळी जिथे जाऊ तिथे विषेशतः भारतातील शंकर, गणपती मंदिरात रुद्राक्षाची माळ अर्पण करतो. हजारो मंदिरात अशा माळा अर्पण केल्या आहेत. एकदा एका लहान गावातील श्रीकृष्ण मंदिरात गेलो. तेथे रुद्राक्ष देण्याचा प्रयत्न केला पण पुजाऱ्याने रुद्राक्ष घेतले नाही. त्याने सांगितले की रुद्राक्षाचा संबंध शंकराशी आहे. विष्णूशी नाही. पण या उलट जेव्हा आम्ही बद्रीनाथला गेलो तर तेथील पुजाऱ्याला २१ रुद्राक्ष दिले आणि त्याला सांगितले की आम्हाला कृष्ण मंदिरात असा असा अनुभव आला. तुम्ही रुद्राक्ष घेणार का? तो म्हणाला तुम्हाला माहित नाही का? शंकर विष्णूची आणि विष्णू शंकराची आराधना करतात. हे सर्व भेद माणसांनी निर्माण केले आहेत. असे म्हणून त्याने अत्यंत श्रद्धेने रुद्राक्ष घेऊन देवाच्या पायाशी ठेवले. आम्ही फुकट प्रसाद म्हणून रुद्राक्ष देतो. त्याचा काही लोक गैरफायदा घेऊ लागले. काही सरळ सरळ हक्काने मागतात आणि नाही म्हटले तर चिडतात.

एकदा आमच्या विजय नगर कॉलनीत खैरे यांच्या बंगल्यात गुलदस्ता या सिनेमाचे शुटिंग होते. नायक मकरंद अनासपुरे, जितेंद्र जोशी, उदय टिकेकर आले होते. मला हे कळल्यावर मी मित्राची मुलगी पिंकी (राजश्री लांडगे)ला फोन केला. कारण ती पण सिनेमात काम करते आणि मकरंद अनासपुरे यांच्यासोबत तिचा ‘गाढवाचे लग्न’ हा चित्रपट गाजलेला आहे. मी पिंकीला म्हणालो, ‘तुझा हिरो आलाय घरा शेजारी’ त्यावर ती म्हणाली, ‘काका थांबा, अर्ध्या तासात मकरंद तुमच्या घरी येतोय.’ चक्क थोड्या वेळात मकरंद आणि जितेंद्र घरी आले. त्यांना कैरीचे पन्हे दिले पण मकरंद नको म्हणाला. मग त्यांना रुद्राक्ष दिले. त्यानंतर चार पाच दिवस रोज दुपारी गप्पा मारायला घरी येत. दुसऱ्या दिवशी त्यांना पुन्हा पन्हे विचारले. तर दुसऱ्या दिवशी त्यांनी घेतले आणि पिऊन झाल्यावर मकरंद म्हणाला, ‘काल उगाचच शायनिंग मारायला गेलो आणि चांगल्या पन्ह्याला मुकलो.’ रुद्राक्षाच्या गप्पा निघाल्यावर मी फुकट प्रसाद म्हणून रुद्राक्ष देतो हे ऐकल्यावर ते म्हणाले फुकटची किंमत नसते आणि ही अनमोल गोष्ट फुकट कधीच देऊ नका! पण मी सांगितले परमेश्वराने इतके भरभरून दिले तर त्याच्या बदल्यात पैसे घेणे किंवा रुद्राक्ष विकणे मला पटत नाही! त्याने एक चांगला सल्ला दिला. तो म्हणाला की एक बॉक्स येथे ठेवा. ते सील करा. कुलूप लावा आणि त्यावर लिहा स्वेच्छेने आपणास वाटेल तेवढी रक्कम या बॉक्समध्ये टाका. यात जमा होणारा पैसा हा समाज कार्यासाठी उपयोगी येईल. लोक स्वतःहून पैसे देतील! पण विचारांती मला ते पटले नाही. त्यामुळे तसे काही केले नाही. दक्षिण भारतीय लोकांना रुद्राक्षाबाबत इतरांपेक्षा जास्त श्रद्धा आहे. त्यामुळेच दक्षिण भारतात मला रुद्राक्ष बाबा म्हणूनच ओळखतात. अशाप्रकारे रुद्राक्ष बाबा या नावातून माझ्याकडून भारतीय संस्कृती संवर्धनाचे आणि पर्यावरणाचे कार्य नकळत भोले शंकर यांनी करून घेतले. ही सर्व आई वडिलांची पुण्याई आणि प्रभूची कृपाच होय!
तसं पाहीलं तर ही केवळ साधी रुद्राक्षाची झाडे. पण त्या मागे आमची श्रद्धा, अपार मेहनत दडली आहे. आजही भर उन्हाळ्यात एखाद्या रणरणत्या दुपारी जेव्हा आम्ही या रुद्राक्षांच्या झाडाखाली बसतो तेव्हा तृप्तेची भावना जाणवते. डवरलेली ही झाडे पाहताना कोणतीच भावना मनाला स्पर्शतही नाही. केवळ एक निर्मळ आनंद समधानाचीच जाणीव होते, मग अशावेळी मला भोले शंकर आणि नेपाळमधील त्या उद्योजकाच्या आईचा चेहरा या झाडांच्या छायेत सौम्य हसताना नजरेस पडतात…धन्य ती आई जिच्यामुळे मला ही सेवा करण्याचं भाग्य लाभलं.