
सन १९९६ साली आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड ट्रिपला जाण्याचा विचार करत होतो. पण अचानक जानेवारी महिन्यात टीव्हीवर व नंतर वर्तमानपत्रात भारत सरकारतर्फे कैलास मानसरोवर यात्रेसाठी अर्ज मागवलेली जाहिरात पाहण्यात व वाचनात आली. बालपणापासूनच भोले शंकरावर श्रद्धा, भक्ती असल्याने कैलास पर्वताबद्दल मनात सुप्त आकर्षण होतेच. त्यामुळे डॉक्टरांकडून शारीरिक तपासणी करून शरीर क्षमतेच्या प्रमाणपत्रासह मी आम्हा दोघांचा अर्ज भrरला. एकूण प्रवास ४० दिवसांचा आणि खर्च प्रत्येकी ३६ हजार रुपये. त्यानंतर १८ जून रोजी टेलिग्राम आला की आपली कैलास-मानस यात्रेसाठी निवड झाली आहे. पुढील गोष्टींची पूर्तता करा. पण फक्त माझ्या नावाची मंजुरी होती. शर्मिष्ठाचा काहीच उल्लेख नव्हता. आम्हाला तर जोडीने जायचे होते आणि मंजुरी तर माझी एकट्याची आली होती! मी लगेच दिल्लीतील एका मित्राला फोन करून सांगितले आणि परराष्ट्र मंत्रालयात जाऊन चौकशी करून येण्याची विनंती केली. थोड्याच वेळात शर्मिष्ठाच्या नावे पण मंजुरीचा टेलिग्राम आला. आमची सहाव्या बॅचसाठी निवड झाली होती आणि ६ जुलैला दिल्लीत हजर व्हायचं होतं.
मोठ्या उत्साहाने यात्रेच्या तयारीला सुरुवात झाली. आम्हाला यात्रेबाबत काहीही माहिती नव्हती. भारत सरकारकडून यासंबंधी पूर्वतयारीबाबत एक सूचना-माहिती पुस्तिका आली होती. त्या ठिकाणी दोन मुक्काममधील अंतर, प्रवासाची माहिती, प्रवासात सोबत घ्यावयाची औषधे, इतर आवश्यक वस्तू, कपडे, फराळ आणि पॅकिंग कसे असावे याबाबत सविस्तर सूचना होत्या. तसेच दिल्लीला जाण्यापूर्वी आवश्यक विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या आणि स्ट्रेस टेस्ट रिपोर्ट अशी सर्व माहिती तयार करून तयार होतो. आमचे एक परिचित श्री. एकनाथ कोटकर हे दोन वर्षे आधी ही यात्रा करून आले होते. त्यामुळे त्यांचेही मार्गदर्शन घेतले.
नाशिक जवळच देवळाली कॅम्प या सैनिकी छावणी भागात ट्रेकिंग शूज, मिलिटरीच्या बॅगा, स्मोक गॉगल, विंडचीटर, कॅमेरा वगैरे साहित्य खरेदी केले. यापूर्वी आम्ही परदेश प्रवास केला होता. पण इतर देशातील प्रवास आणि कैलास यात्रेत खूप फरक होता.

पूर्वी आपले आजेपणजे काशी यात्रेला जाताना स्वतःचा दशक्रियाविधी गावीच करून यात्रेला बाहेर पडत असे. जुन्या माणसांकडून ऐकलेले आठवते. कारण त्याकाळी काशीयात्रेला गेलेला माणूस जिवंत सुखरूप परत येण्याची शाश्वती नसावी. त्याच विचारसरणीचे वंशज असलेल्या माझ्या परिचितांमधील काही हितचिंतकांनी आम्ही कैलास-मानस यात्रेला जाण्यापूर्वी आमचे मृत्यूपत्र करून ठेवावे अशी व्यावहारिक प्रेमळ सूचना केली होती! पण भोलेनाथावर पूर्ण भरवसा आणि आमचे प्रबळ मनोबल. प्रचंड इच्छा शक्तीची जाणीव असल्याने आम्ही त्यांचे कोणाचे ऐकले नाही… पण मनातून कुठे तरी काही तरी अज्ञात चिंता, भय वाटत असल्याने मी कैलास-मानस यात्रेला जात असल्याची जास्त वाच्यता कोणाकडे केली नाही. त्यामागे दोन व्यावहारिक कारणेही होती. एक म्हणजे घरच्यांचा कोणाचा भावनिक विरोध होऊ नये आणि दुसरे म्हणजे उगाच कोणाला आपल्याबद्दल काळजी वाटू नये!
भगवान शंकर! देवाधि देव महादेव! समस्त प्राणी सृष्टीच्या शक्तीचा महास्त्रोत समुद्र मंथनातुन निघालेल्या अमृताची अपेक्षा न करता कोणीच वाटेकरी न होणाऱ्या विषाचा प्याला जगत कल्याणासाठी सेवन करणाऱ्या या भोळया शंकराच्या दर्शनाची आस लहानपणा पासुन मंनात होती. प्रत्येंक गोष्टीला वेळ यावी लागते आणि परमेश्वर इच्छा, व त्याच्या प्ररेणे शिवाय काहीच होवू शकत नाही. याची पुरेपूर प्रचिती मिळणारा अनुभव, आयुष्याचा सार्थक होणारा अनुभव कैलास मानसरोवर यात्रेने मिळाला.
६ जुलै १९९६ रोजी कैलास मानस यात्रेसाठी मी आणि माझी पत्नी शर्मिष्ठा सकाळी दिल्लीला पोहोचलो. अशोक यात्री निवास या हॉटेलमध्ये आम्हा सगळ्यांची राहण्याची व्यवस्था केलेली होती. सहा तारखेला सकाळी नऊ वाजता दिल्लीला भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयात सगळे यात्रेकरू एकत्र जमले. अजित गुप्ते अंडर सेक्रेटरी हे यात्रेचे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रथम सगळ्यांची ओळख करून देण्यात आली. गुप्तांनी यात्रे संबंधी संपूर्ण माहिती सांगितली. त्यातल्या अडचणी धोके तसेच घ्यावयाची काळजी सगळी माहिती सांगून यात्रेकरुंचे जणू मनोबल वाढवले. त्यानंतर लगेच सगळ्यांना इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस च्या हॉस्पिटल मध्ये मेडिकल चेकअपसाठी पाठवण्यात आले. तिथे गेल्यावर मेडिकल ऑफिसरकडे आपण घरून निघताना सगळी मेडिकल सर्टिफिकेट व चाचणी रिपोर्ट पाहिले जातात किंवा गरज वाटली तर चाचण्या करायला लावतात. डॉक्टर सुद्धा यात्रेच्या प्रवासाच्या अडचणींची कल्पना देऊन तुमच्या शारीरिक क्षमते बरोबरच तुमची इच्छाशक्ती व मनोबल याचीही खात्री करून घेतात. आम्ही एकूण ४२ जण मेडिकल चाचणीसाठी गेलो पण त्यातले सात जण मेडिकल फिटनेस मध्ये अनफिट ठरल्याने त्यांना यात्रा करायला परवानगी नाकारण्यात आली. मेडिकल फिटनेस ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याने तेथे कुठल्याही प्रकारची तडजोड चालत नाही.

आमच्यातील बिचारे ७ जण नाराज होऊन परत गेले. गुजरातच्या एक बाई तर डॉक्टरांकडे धरणे धरून बसले की मला यात्रेत कैलास मानस ला मरण आले तरी चालेल पण मला जाऊ द्या! पण याबाबत कुठलीही तडजोड चालत नाही. याचे खरे महत्त्व प्रत्यक्ष यात्रा करताना पदोपदी जाणवते. भगवान शंकराच्या इच्छेने आम्ही दोघेही मेडिकल फिटनेस मध्ये पास झालो. दुसऱ्या दिवशी यात्रेला जाणाऱ्या ३५ जणांचा ग्रुप पुन्हा परराष्ट्र मंत्रालयात अजित गुप्तेंच्या पुढच्या मार्गदर्शनासाठी एकत्र आला. तिथे यात्रेकरूंच्याविविध कमिट्या तयार करण्यात आल्या. तशा फुड कमिटी, मेडिकल कमिटी, लगेज कमिटी वगैरे. ही यात्रा भारत व चीन या दोन देशातून जाते. म्हणजे प्रत्यक्ष कैलास पर्वत व मानस सरोवर हे तिबेट चीन मध्ये आहे. भारतात या प्रवासात खाण्यापिण्याची, राहण्याची संपूर्ण व्यवस्था कुमाऊ मंडळ विकास निगम मार्फत उत्कृष्टपणे होते. पण चीन मधल्या प्रवासात म्हणजे कैलास परिक्रमा व मानसरोवर परिक्रमेच्या जवळजवळ आठ दिवस आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्याला स्वतः करावी लागते. त्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ व स्वयंपाकाची भांडी तांदूळ वगैरे सगळ्या वस्तू लागतात. दिल्लीतूनच बरोबर घ्यावे लागतात. त्याची खरेदी व्यवस्थाही फुड कमिटी करते. प्रत्येकाने जरी आपापली वैयक्तिक औषधे घेतलेली असली तरी सगळ्यांसाठी अशी काही औषधे मेडिकल कमिटी घेते. प्रत्येकाचे सामान व्यवस्थित पॅकिंग केले आहे की नाही त्याचे वजन वगैरे ची काळजी लगेज कमिटी करते. म्हणजे प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधीच या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. आठ तारखेला या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या. चिनचा व्हिसा मिळण्यासाठी पासपोर्ट व इतर फॉर्म दिले. ९ तारखेला व्हिसा मिळाला. व स्टेट बँकेतून डॉलर घेतले. कारण चीनमध्ये त्या सरकारने यात्रेकरुसाठी पुरवलेल्या सर्व सोईसुविधासाठी पैसे भरावे लागतात व चीनमधला प्रवासासाठी काही पैसे लागतात. जसे घोडेवाले, याक व इतर वैयक्तीक खर्चासाठी पैसे लागतात.
सगळ्या गोष्टी सुरळीत पार पडल्या व आता फक्त कैलास… भगवान शंकराचे दर्शन,! प्रत्यक्ष प्रवासाची उत्कंठा सगळ्यांच्या मनात होती!
सकाळी चार वाजता केएमव्हीएनच्या आरामदायी बसने ‘हॉटेल अशोक यात्री निवास’ मधल्या गणपतीच्या मूर्तीपुढे आरती करून प्रवासाला सुरुवात झाली. सकाळी रस्त्यात केएमव्हीएनच्या रेस्ट हाऊसमध्ये नाश्ता मिळाला. मुरादाबादच्या पुढे रामपूर म्हणून एक गाव लागतं तिथं गुप्ता कुटुंब हे पूर्वी कैलास मानसरोवर यात्रेला जाऊन आलेलं आहे. या यात्रेला जाणाऱ्या सगळ्या लोकांना गुप्ता कुटुंबाकडून नाश्ता, फराळ दिला जातो. फुलांच्या माळा घालून ते सर्व यात्रेकरूंचं स्वागत करतात. यात्रेकरूंची सेवा करणं हे एक मोठं पुण्य आहे या भावनेने ते खूपच भारावलेले आहेत. दुपारी भोवाली इथे जेवण करून रात्री आलमोडा इथे मुक्काम केला. दिल्ली ते आलमोडा चारशे आठ किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. भुरु भुरु पाऊस पडत होता. दिल्ली सोडल्यानंतर उंचीतला, हवेतला आणि तापमानातील फरक जाणवायला लागला. नैनिताल भोवालीच्या पुढे पुढे थोडसं बाजूला राहत पहिल्या दिवशी जवळजवळ बारा ते चौदा तासांचा बसचा प्रवास झाला.

सकाळी नाश्ता करून लवकर पुढचा अलमोडा ते धारचुला २१२ किलोमीटरचा बसचा प्रवास करायचा होता. थोडं पुढे गेल्यावर पहाडी लोकांचं एक देऊळ लागतं. गोलू देवतांचं इथे दर्शन घेतलं. हा देव आपल्या मनोकामना पूर्ण करतो आणि इच्छा पूर्ण झाल्यावर तिथे घंटा बांधतात; अशा हजारो घंटा इथे बांधलेल्या होत्या. संपूर्ण हिमालयातील घाटातला प्रवास, बाहेर पाऊस, ढगांचा लपंडाव, बऱ्याच वेळा आपण वर ढ़ग खाली असं दृश्य, हिरवंगार-निसर्गाचं मनोरम दृश्य डोळ्यात किती साठवू नि किती नको असं होतं. प्रवासाचा शेवटचा टप्पा नदीच्या काठाने नदीच्या अलीकडे भारत आणि पलीकडे नेपाळ. संध्याकाळी चारला धारचुलाला पोहोचलो. धो धो पावसाने आमचं स्वागत केलं.
हवेत प्रचंड गारठा होता. दोन हजार वीस फूट समुद्रसपाटीपासून उंचीवर आहे. कालिगंगा नदीच्या पाण्याला प्रचंड ओढ आणि प्रचंड आवाज. नदीवर पूल नेपाळच्या हद्दीत जाण्यासाठी तिकडे जाऊन जुजबी खरेदी केली. धारचुलाचा कॅम्प, दोन मोठे हॉल, एक पुरुष यात्रेकरूंसाठी आणि दुसरा महिला यात्रेकरूंसाठी. आमच्या ३५ जणांच्या ग्रुपमध्ये २१ पुरुष आणि १४ महिला होत्या. फक्त चारच जोडपी होती. म्हणजे इतर दहा महिला या एकट्याने यात्रेला आलेल्या होत्या. त्यांच्या मनोधैर्याचं कौतुकच वाटलं आणि आम्हाला एक हिंमतच आली. सगळ्यात वयस्कर ६२ वर्षांची स्त्री यात्रेकरू आणि सगळ्यात तरुण २३ वर्षाचा कॉलेजचा विद्यार्थी होता. इतर सगळेजण ३५ ते ५० वयोगटातील होते. महाराष्ट्रातून आठ, गुजरातचे दहा, राजस्थानचा एक, तामिळनाडूचे सात, बंगालचे तीन, पंजाबचा एक, दिल्लीचे तीन, आणि कर्नाटकचा एक. राष्ट्रीय एकात्मता ही अशा प्रकारे साध्य होते. कोणी कुठलाही असो प्रत्येकजण एकाच ध्यासाने यात्रेला आलेला होता. रात्रीचं जेवण करून झोपलो.

सकाळी नाश्ता करून यात्रेला सुरुवात झाली. बसने धारचूला ते तवा घाटापर्यंतचा १९ किलोमीटरचा प्रवास होता. पण रस्त्यात दरडी कोसळल्याने बसेस रस्त्यातच थांबल्या. पावसात हिय्या करून बरेचसे पायी आणि थोडंसं जीपने मार्गक्रमण केलं. तवाघाटपर्यंतचा रस्ता संपल्यावर सगळा पायी प्रवास होता. सकाळी नऊ वाजता तवाघाटला पोहोचायचं होतं पण आम्हाला वाजले दोन. यात्रेची खरी कल्पना यायला आता सुरुवात झाली होती. नदीला लहानसहान ओढे-नाले येऊन मिळतात. बर्फाचं शुभ्र पाणी, रस्त्यात अनेक धबधबे दिसतात. इथून पुढे वीज नाहीच. रस्त्यात प्रचंड वेगाने येणाऱ्या झऱ्याच्या पाण्याच्या वेगाचा उपयोग करून पिठाची गिरणी दिसली. इकडे याच पद्धतीच्या गिरण्या.
धारचुलापासून आमच्या यात्रेकरूंबरोबर आमच्या मदतीसाठी भारत सरकारतर्फे पीआरडीचे. म्हणजे आपल्याकडे जसे एसआरपी आहेत; असं चार जवान बंधुकधारी, दोन वायरलेस सेट्स पुढे नि एक मागे. एक डॉक्टर आणि एक सहाय्यक, परराष्ट्र मंत्रालयाचा एक प्रतिनिधी, केएमव्हीएनचा एक गाईड. तसंच दिल्लीपासून प्रत्येक बॅचसोबत सरकारचा एक अतिशय उच्च अधिकारी. लायझन ऑफिसर म्हणून बरोबर पाठवतात आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही बॅच यात्रा पूर्ण करत असते. धारचुलला आपण प्रवासासाठी घोडे, मदतीसाठी हमाल, चालण्यासाठी काठी घ्यायची असते. बरेचसे लोक ज्यांचा पायी प्रवास कठीण जातो ते घोडे करतात. हमाल मात्र जरूर घ्यावा. धारचुला सोडल्यावर रस्त्यात कुठेही तुम्हाला घोडे हमाल किंवा काठी मिळत नाही.

तवाघाट तीन हजार फूट उंचीवर आहे, वाहनाचा प्रवास इथेच संपतो. तिथून पुढे संपूर्ण पायी प्रवास. हा पायी प्रवासाचा पहिला दिवस म्हणजे संपूर्ण यात्रेची कसोटीच, तवाघाट ते पांगू हे दहा किलोमीटरचं अंतर. त्यातले पहिले साडेसात किलोमीटर अतिशय कठीण चढाई आहे. पांगू हे सात हजार चारशे फूट उंचीवर म्हणजे साडेसात किलोमीटरच्या चढाई चार हजार चारशे फूट उंची गाठायची. पर्वताच्या पोटाशी नागमोडी पाऊलवाट आहे. सगळा दगडांचा रस्ता, पायऱ्या नाहीत. जर चढ़ावाचा विचार केला तर अंदाजे सहा हजार! हो. सहा हजार पायऱ्या चढून वर जायचं. पहिल्या दिवशी पहिला पायी प्रवास, याला थानेधारची चढाई म्हणतात. जो ही चढाई चढून जातो त्याला पुढच्या यात्रेत जायला हरकत नसते असा ठोकताळा. एका बाजूला हजारो फूट खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट उंच पर्वत. केव्हा चक्कर येईल याचा नेम नाही म्हणून चालताना आजूबाजूला पाहायचंच नाही. दरीकडे तर मुळीच नाही. फक्त ‘ओम नमः शिवाय’चा जप करत प्रत्येक पाऊल टाकायचं. त्याच्या दर्शनासाठी जात आहे त्यालाच काळजी. आम्ही दोघांनीही घोडे केले होते. हमाल केला होता. इथे कोणाला घोड्यावर बसायची सवय! लग्नाच्या मिरवणुकीत बसलो होतो तेवढाच आयुष्यातला घोड्यावर बसायचा अनुभव माझ्यापाशी होता; बायकोला तर तोही नव्हता. एवढ्या चिंचोळ्या रस्त्यावर पाहिजे पायी चालायची भीती. तिथे घोड्यावर बसायला हिम्मतच होईना. पायी चालताना पहिल्या पंधरा मिनिटात दमछाक झाली. मग इलेक्ट्रॉल टाकलेले पाण्याचे घोट घ्यायचे श्रमपरिहारासाठी. घामाच्या धारा, बाहेर थंड हवा, कोणत्याही क्षणी पाऊस येईल म्हणून अंगावर रेनकोट, थंड हवेचा त्रास होऊ नये म्हणून कानटोपी, पायात दोन दोन पायमोजे आणि ट्रेकिंग शूज आयुष्यात कधीही न घातलेले. वणीच्या गडावर चढताना चारवेळा बसल्याशिवाय वर पर्यंत पोहोचू न शकलेल्या आम्ही पहिल्याच दिवशी सहा हजार पायऱ्या, अंगावर एवढे कपडे, पायातले बूट घालून चढायला लागलो. सगळेजण थोड्याफार फरकाने त्याच परिस्थितीत. मग थोडा वेळ पायी, थोडा वेळ घोड्यावर, घोड्यावर बसण्याची भीती वाटते म्हणून पायी. चालवत नाही म्हणून पुन्हा घोड्यावर; अशी सारखी कसरत करत शंकराचं नाव घेत अगदी शेवटच्या टोकावर कसे चढलो हे भगवान शंकरचं जाणे.
टॉपला आल्यावर खोपट्यात चहा मिळाला. त्यावेळी त्या ठिकाणी तो चहा म्हणजे अमृताहूनही श्रेष्ठ पेय वाटलं. पुढच्या अडीच किलोमीटर पुष्कळसा सपाट रस्ता होता. तो मात्र पायीच पूर्ण केला. संध्याकाळ झाली होती. पांगूल पोहोचल्यावर आज आपण जिवंत आहोत याची खात्री पटली.

सकाळी लवकर उठून चहा खाणं झाल्यावर प्रवासाला सुरुवात झाली. आळस चालतच नाही. थोडं उशिरा निघू म्हणून भागत नाही. कंटाळा करायचा नाही. रात्री झोपताना लायेजन ऑफिसर आणि केएमव्हीएनचे गाईड दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाची, चढ-उताराची, रस्ता किती अवघड आहे, साधारण किती वेळ लागेल आणि त्या हिशेबाने सकाळी केव्हा प्रवासाला सुरुवात करायची वगैरे पूर्ण माहिती देत असत. त्याप्रमाणे सगळेजण दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाला सुरुवात करायचे तसेच आपले घोडेवाले, हमाल पण खूपच मार्गदर्शन करायचे.
आमच्या आजचा प्रवास पांगू ते सिरखा एकूण दहा किलोमीटर अंतर ७४०० फुटावरून आठ हजार ४५० फूट उंचीवर पण हा प्रवास प्रथम प्रथम दीड हजार फूट नंतर नऊशे फूट उताराचा होता. पांगू सोडल्यावर एक सुंदर धबधबा लागला. त्याही हिमखौल नदीच्या पात्रावर पूल बांधायचं काम चालू होतं. पण आम्हाला त्या पात्रातूनच नदी पार करावी लागली. यावेळी पीआरडीच्या जवानांनी विशेषतः बायकांना खूपच मदत केली. येथून नारायण आश्रमाला जायचा रस्ता होता. हा एक अतिशय सुंदर रमणीय ‘आश्रम’ आहे. अनंत प्रकारची फुलझाडं आश्रमाला शोभा आणतात. हा आश्रम साधारणपणे पन्नास वर्षांपूर्वी नारायण स्वामी यांनी स्थापन केला आहे. तिथे माताजींनी आश्रमाची पहिली माहिती दिली आणि आता तेथे स्वामी आहेत त्यांनी कैलास यात्रेचं महत्त्व विशद केलं. सगळ्या यात्रेकरूंना तिथे अल्पोपाहार मिळाला. थंडगार गोड पाणी, अल्पोपहार आणि स्वामींची अध्यात्मिक वचनं ऐकून सगळा श्रमपरिहार झाला. रस्त्याने अभ्रकाचे साठे दिसले पण या भागात मायनिंगला सरकारने परवानगी दिलेली नाही. नंतर सिरखाला पोहोचलो. जेवण आणि आराम करून संध्याकाळी ढगांचं सौंदर्य आणि लपंडाव पाहायला मिळाला. इथून पहिल्यांदाच बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन झालं. एखाद्या लहान मुलाने दाराच्या आडून आपल्याकडे पाहावं आणि आपलं त्याच्याकडे लक्ष जाताच त्याने दाराआड लपावं त्याप्रमाणे ही शिखरं ढगाआड लपत होती. आजूबाजूला अगदी छोट्या छोट्या वस्त्या आहेत. त्यातल्या दोन लहान मुलींनी पहाडी गाणी म्हणून यात्रेकरूंचं मनोरंजन केलं.

सिरखापासून गालाचा सोळा किलोमीटरचा प्रवास. सुरुवातीला उताराचा रस्ता आणि नंतर एकदम चढ. रुंगलिंग टॉप दहा हजार फूट उंचीवर. पूर्ण प्रवास दाट झाडीमधून. पाऊस पडून गेलेला. रस्त्यात चिखल, सुकलेली ओली पानं, रस्त्यात पावसाने निसरडी झालेली. अतिशय सुंदर सृष्टीसौंदर्य, पक्षांचा किलकिलाट, चढ-उताराचा प्रवास त्रासदायक असला तरी निसर्गाच्या रमणीय सानिध्याने थकवा जाणवतच नव्हता. पाण्याचे प्रचंड धबधबे. रोरो आवाज करत उंचावरून प्रचंड वेगात येणारे पाण्याचे प्रवाह.
इतकं पांढरंशुभ्र बर्फाचं पाणी की त्या पांढऱ्याशुभ्र त्याच्या डोळ्यांना त्रास व्हावा. उंच झाडी. आजचा प्रवास म्हणजे जणू पिकनिकला आल्यासारखं वाटलं. पण थांबायला वेळ नव्हता; कारण पुढच्या कॅम्पला पोहोचलं पाहिजे. चढ आणि उतार दोन्ही प्रकारचा प्रवास. एक लक्षात आलं की चढावापेक्षा उतार जास्त त्रासदायक आणि धोकादायक असतो. गुडघ्यांना फारच त्रास होतो. रस्त्यात छोटी-छोटी चहाची दुकानं लागली. यांना सरकारने अर्थसहाय्य केलेलं. यात्रेच्या तीन महिन्यांच्या काळात यात्रेकरूंच्या सेवेसाठीच ही दुकानं चालवली जातात. तिथे चहाबरोबर छोले आणि बटाट्याची सुकी भाजी मिळते. अशा ठिकाणी थोडावेळ बसून विश्राम करून मागून येणाऱ्या लोकांसाठी थांबले होतं. वातावरणात त्या ठिकाणी हा फराळ म्हणजे एक पक्वान्न असतं.

गाला ते मालपा ११ किलोमीटर चे अंतर. संपूर्ण उताराचा प्रवास होता. ६६२५ फूट उंचीवर गालावरून जिप्ती-बिंदाबुट्टीपर्यंत जवळजवळ सरळ रस्ता. पुढे मात्र लखनपूरपर्यंत ४४४४ पायऱ्या उतराव्या लागतात. हा खूपच त्रासदायक प्रवास होता. पायऱ्या उतरताना खूप त्रास होतो. नेहमी पडायची भीती वाटते. गुडघ्यांना प्रचंड त्रास. उतारावर कुठेही घोड्यावर बसता येत नाही. त्यामुळे सक्तीचा पायी प्रवास. लखनपुरला कालीगंगेचं दर्शन होतं. या नदीच्या काठाकाठाने जाता पुढचा प्रवास असतो. प्रचंड वेगाने येणाऱ्या पाण्याचा कानठळ्या बसवणारा आवाज. आवाजाची भीती वाटते पण तेवढाच धीरही येतो. निसर्गाचं अक्राळ-विक्राळ रूप. त्याचं पहिल्यांदाच दर्शन होतं. अगदी चिंचोळ्या रस्त्याने प्रवास. चिंचोळा म्हणजे फक्त आपलं पाऊल ठेवता येईल इतकंच. छाता आणि नजंग या धबधब्यांखालून जावं लागतं. लहान पायवाटेवरून, बर्फाचे थंडगार पाणी त्या पाण्याबरोबर लहान लहान दगड गोटे येत असतात. खाली पाणी. या अशा अत्यंत अवघड आणि धोकादायक परिस्थितीत मार्गक्रमण आपण करत असतो. अशावेळी हमखास देव आठवतो. नामस्मरण करत पुढचा प्रवास होत राहतो. जगाशी कुठलाही संबंध नाही, संपर्क नाही, या विशाल निसर्गात फक्त आपण आणि आपणच. सकाळपासून पाऊस सुरू होता. आता या पावसाची इतकी सवय झाली होती की त्याचं कुठलाही भय वाटेनासं झालं होतं. तो असणारच होता. वरून पावसाचं पाणी, रेनकोट आणि चालण्याच्या श्रमामुळे आतून प्रचंड घामाच्या धारा. थंड वारा काय काय होतं. तेव्हा हे आठवलं तरी अंगावर शहारे येतात. दुपारी मालपाच्या कॅम्पवर पोहोचलो. ओले ओले पाय मोजे, हात मोजे, ओले कपडे; केव्हा एकदा त्यातून सुटका होईल असं वाटतं. मालपाचा हा कॅंप कालीगंगा नदीच्या काठावरच आहे. त्या पाण्याचा कानठळ्या बसवणारा आवाज रात्रंदिवस आपली सोबत करत राहतो. दुपारी चारला ऊन्ह आल्यावर सगळ्यांना उठवलं आणि कपडे वाळत घातले. आज पहिल्यांदाच इतकं छान दिसलं. संध्याकाळी काय कार्यक्रम होता मालपा गावातून लाकडं विकत आणून कॅंपफायर केलं. याचा खरा फायदा बूट वाळवण्याकरता झाला. त्या सगळ्यांनी बूट सुकवले. गाणी विनोद सगळं काही झालं. आमच्याबरोबर आलेले मुंबईचे डॉक्टर श्री आणि सौ शिंदे यांच्या लग्नाचा वाढदिवस होता; तो साजरा झाला याच मालपाच्या कॅम्पवर. नंतर दोन वर्षांनी म्हणजे १९९८ साली कालीगंगा नदीवर दरड कोसळून पाण्याचा प्रवाह अडल्याने बांध तयार झाला आणि बॅकवॉटर ने मालपाचा कॅम्प तिथल्या जवळ जवळ २०० यात्रेकरु, घोडे, सामान सगळ्या सकट वाहून गेला त्यावेळी प्रतिमा बेदी यांचा मृत्यू झाला अशा नैसर्गिक दुर्घटना क्वचितच होत असतात.

मालपा ते बुधी बारा किलोमीटरचा प्रवास करायचा होता. ६६२५ फुटावरून नऊ हजार फूट उंचीवर म्हणजे अडीच हजार फूट चढाई होती. रात्रभर पाऊस पडत होता. सकाळी निघालो. छान ऊन्ह पडलं होतं. थोडं पुढे गेल्यावर कळलं की लँडस्लाईडमुळे रस्ता जवळजवळ बंदच आहे. रात्रभराच्या पावसाने लँडस्लाईडमुळे खूप चिखल झाला होता. मालपाला आयटीबीपीच्या जवानांचा कॅम्प होता; त्यातले दोन जवान आमच्या मदतीसाठी धावून आले. गुडघाभर चिखल पाऊल ठेवण्याइतपत अरुंद पायवाट, खाली प्रचंड वेगाने वाहणारी कालीगंगा नदी. रस्ता कसा क्रॉस करायचा! आयटीबीपी च्या जवानांनी प्रत्येक यात्रेकरूला दोन्ही बाजूंनी धरून (शाळेत चुकार मुलाला आणताना जशी टांगळटोळी करतात) तसं हवेत पाय गुडघ्यात वाकवून कठीण क्रॉस केला. पुढ़े चिखलातून चाललो. कुठल्याही क्षणी पाय घसरून तोल जाऊन खाली गंगेतच गेलो असतो. बायकांना तर त्यांनी चक्क पाठीवर बसवून रस्ता क्रॉस केला. आयटीबीपीचे ते दोन जवान हे आम्हाला परमेश्वराचे दूत वाटले. त्यांच्या मदतीशिवाय आम्ही रस्ता ओलांडू शकत नव्हतो. पुढच्या धबधब्याच्या पाण्यात पाय धुतले. रस्त्याच्या कडेने लहान खुरटी झाडं आहेत. त्यात एक प्रकार बिच्छूघास म्हणजे विंचू गवताचा आहे त्या पानांना स्पर्श झाला तर विंचू चावल्याच्या वेदना होतात. त्याच्यापासून फार सांभाळावं लागतं. त्या झाडाशेजारीच दुसरं लहान झाड होतं. त्याच्या पानांचा रस वेदनेच्या जागी लावला तर वेदना शांत होतात. विशेष म्हणजे ही दोन्ही प्रकारची झाडं नेहमी जोडीनेच असतात असं समजलं. वा रे परमेश्वर! वेदनेच्या झाडाजवळच वेदनाशामक झाड पण. हिमालयात नेहमीच लॅंडस्लाईडस होत असतात. आमच्या ग्रुपचे काही लोक थोडे पुढे गेले होते आणि काही लोक मागे होतो. काय परमेश्वराचा संकेत अचानक माझं लक्ष डोंगराकडे गेले होते. तेवढ्यात लॅंडस्लाईडस व्हायला लागली. म्हणजे अर्ध मिनिट जरी मी पुढे झालो असतो तर त्या लॅंडस्लाईडखाली दगडधोंड्याचा आणि मातीचा वर्षाव माझ्यावर होऊन माझं काय झालं असतं त्या देवालाच ठाऊक! अचानक थांबलो म्हणून वाचलो. तेवढ़्यात त्या लॅंडस्लाईडचं प्रत्यक्ष व्हिडिओ शूटिंग केलं. तो प्रसंग माझ्या कॅमेऱ्यात बंद बंदिस्त करून तो काळ आणि ते स्थळ मी आयुष्याची आठवण म्हणून जपून ठेवली आहे.
आजच्या प्रवासात खूपच गोष्टी घडल्या मुंबईच्या एक स्त्री यात्रेकरू रजनीश यांच्या डोक्याला वरून आलेला दगड लागला. त्यांचं डोकं फुटलं त्या नदीत पडणार तेवढ्यात घोडेवाल्याने त्यांचा हात धरून ओढल्याने त्यांचा जीव वाचला. त्यांना प्राथमिक औषधोपचार केला गेला. स्ट्रेचरवरून त्यांना पुढच्या कॅंपवर नेण्यात आलं. हा एक अपघात सोडला तर आमच्या बॅचची पूर्ण यात्रा सुखरूप पार पडली. बुधीचा कॅम्प अतिशय सुंदर आहे.
खूप सारी फुलझाडं आहेत आणि ही सारी फुलं यात्रेकरूंचं स्वागत करत असतात. इथे बायकांसाठी फायबरचा अर्धवर्तुळाकार तंबू आहे पुरुषांसाठी दोन खोल्या आहेत. तिथून सुद्धा बर्फाच्छादित चित्रांचं अतिशय रम्य दर्शन होतं. अपघातामुळे सगळेजण दुःखी होते. बुधीवरून वर जाताना कॅम्प दिसतो समोर; पण तसं नसतं. वास्तवात तो फार लांब असतो. पुलापर्यंत जात पुन्हा चालत यायचं. पूर्ण युटर्न; म्हणजे दिसतं काही आणि चढावं लागतं काही.
बुधी ते गुंजी सतरा किलोमीटरचं अंतर पार करायचं होतं. नऊ हजार फुटावरून अकरा हजार पाचशे फुटावर रजनीबेनला बुधीलाच सोडलं. बुधीचा कॅम्प सोडल्यावर थोड्याच वेळात प्रचंड चढाई लागते. छियालेख टॉपपर्यंत चढाईवर चढून गेल्यावर नेपाळ साईडला एक अतिशय उंचावरून येणारा प्रचंड मोठा धबधबा दिसतो. त्याचं नाव अफिका झरना. पांढऱ्या शुभ्र पाण्याचा प्रत्येक थेंब आणि थेंब स्पटिकासारखा दिसतो. दुर्बिणीतून त्याचं अतिशय सुंदर दृश्य दिसतं. नंतर आपण फुलांच्या मोकळ्या मैदानात प्रवेश करतो. व्यास व्हॅलीमध्ये आपण प्रवेश करतो. आता या रस्त्याची, हवामानाची, कठीण, अवघड गोष्टींची इतकी सवय होते की कशाचीच भीती राहत नाही. गुंजीला पोहोचण्यासाठी पुढे जाऊन नदी ओलांडून गुंजी गावातून मागे यावं लागतं. हिमालयातल्या या लहान लहान वस्त्या निसर्गाची एवढी मुक्तहस्ताने दिलेली देणगी तरीसुद्धा या छोट्या घरांच्या छतावर आम्हाला फुलांच्या कुंड्या दिसल्या. खूप मोठ्या प्रमाणात विविध फुलं आजच्या प्रवासातच दिसली. गुंजीला आयटीबीटीचा कॅम्प आहे. फायबरचा अर्धवर्तुळाकार तंबू. गुंजीहून छोटा कैलासला जाण्यासाठी रस्ता आहे. गुंजीच्या मिलिटरी कॅम्पमध्ये स्टेट बँकेची शाखा आहे. सगळ्यात उंचावरची आणि दुर्गम प्रदेशातली शाखा म्हणून तिची महती आहे.
दिल्ली ला पहिल्यांदा मेडिकल चेकअप झालं होतं. ही पहिली परीक्षा होती तिच्यात पास झाल्यावरच यात्रेची संधी मिळाली होती. पण दिल्ली सोडून आज आठ दिवस झाले होते. ११५०० फुटावर आलो होतो. या आठ दिवसात आपली तब्बेत कशी आहे आणि विशेषत: रक्तदाब आणि हृदयाचे ठोके यात काय फरक झाला; पुढची यात्रा करण्याची शारीरिक क्षमता आहे की नाही याची पुन्हा एकदा तपासणी होते. आज मात्र सगळ्यांनाच टेन्शन आलं होतं कारण आजच्या मेडिकल टेस्टमध्ये अनफिट ठरलो तर इथून पण घरी परत पाठवतात. त्यात कुठलीही तडजोड नसते. संध्याकाळी मिलिटरी कॅम्पमध्ये मेडिकल चेकअपला जाताना छातीत धडधड होत होती. पण भगवान शंकराच्या कृपेने आमच्या बॅचचं कोणीही अनफिट ठरलं नाही. सगळेच पुढच्या प्रवासाला जायला योग्य ठरले. बिचाऱ्या रजनीबेन बुधीपर्यंत येऊन चक्क सात दिवसाच्या खडतर प्रवासानंतर सुद्धा केवळ अपघाताने बुधीच्या कॅम्पला राहत होत्या. त्यांच्या नशिबात भगवान शंकराचे दर्शन नव्हतंच असंच म्हणावं लागेल. गुंजीला रात्री जवानांनी यात्रेकरूंच्या मनोरंजनाकरता कॅम्पफायर केलं. त्यांच्या प्रेमाने सगळेजण भारावले. गुंजीपर्यंत यात्रेकरुंसोबत येणारे पीआरडीचे चार जवान डॉक्टर आणि त्यांचे सहाय्यक ते दोन्ही सेट्स गाईड वगैरे सगळे जण गुंजीला थांबतात. कारण गुंजीपासून पुढे मिलिटरीच्या सहाय्याने पुढची यात्रा होते. मिलिटरी जवान, डॉक्टर, वायरलेस आपल्यासोबत येतात परतीच्या पुढच्या बॅचला घेऊन तो ताफा पुढे धारचुलाला परत जातो.
गुंजी ते कालापानी दहा किलोमीटरचा सरळ प्रवास होता. आता आपण खूप उंचावर आल्यावर मोठी झाडं नाहीत; जंगल नाही. लहान-लहान खुरटी रोपं, बुशेस, फुलझाडं, रुक्ष डोंगर, भकास वातावरण, निसर्गाचं दुसरं रूप, कालीगंगेच्या काठाने प्रवास, वस्ती नाही, हॉटेल नाही, काहीच नाही. आयपीटीच्या जवानांनी चहा पाजला. कुठेतरी दूर पांढरा बर्फ, ग्लेसियर्सचं दर्शन. एका डोंगराच्या खालून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला कालीगंगेचं उगमस्थान मानलं जातं. एका डोंगराच्या कपारीत उंचावर एक गुहा दिसते. तिथे व्यास ऋषींनी तपश्चर्या केली होती असं मानतात. कालापानीला पोहोचल्यावर सुरुवातीलाच मंदिर लागतं. जवानांनी बांधलेलं आणि तेच काळजी वाहतात. मंदिराच्या खालून पाण्याचा स्रोत. त्या रुक्ष वातावरण अतिशय सुंदर दृश्य. मिलिटरीचं एक हेलिकॉप्टर तिथे दुर्घटनाग्रस्त झालं होतं. सगळेच वाचलेत. कोणीही जखमी झालं नाही म्हणून परमेश्वराच्या श्रद्धेपोटी तिथे मंदिर बांधलं. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आजही पाहायला मिळतं.

कालापानी ते नवीडांग नऊ किलोमीटरचा प्रवास ११०५० फुटावरून तेरा हजार शंभर फुटावर जायचं. फार कठीण रस्ता नाही. मोकळं मैदान. आजच्या प्रवासाची प्रचंड उत्सुकता. कारण परमेश्वराच्या चमत्कारांचं दर्शन होणार असतं. हवा स्वच्छ, हलकं ऊन्ह, पाऊस नाही. खरंच नशीबवान! ओम पर्वताचं दर्शन. एका उंच पर्वतावर अश्या प्रकारच्या नैसर्गिक खाचखळगे आहेत की, ज्यात बर्फच साचल्यावर त्याचा आकार ओमसारखा दिसतो. अगदी वरच्या अर्धचंद्र आणि टिंबासहित. दुर्बिणीतून फारच सुंदर दिसतो. उघड्या डोळ्यांनी खूप लांबचं अंतर असल्याने फारसं स्पष्ट दिसत नाही. ढ़ग सारखे येत जात असतात आणि ढगाआड ओम लपत असतो.
वाडवडिलांची पुण्याई म्हणून आम्हाला मात्र ओमचं स्पष्ट, पूर्ण आणि जवळजवळ दिवसभर दर्शन झालं. नवीडांगचा कॅम्प पर्वताच्या पायथ्याशी आहे अगदी संध्याकाळ होईपर्यंत आम्हाला ओमकाराचे दर्शन झालं. रात्री लवकर झोपलो कारण उद्या सकाळी लवकर उठून चीनमध्ये प्रवेश करायचा होता. आतापर्यंत काढलेले सगळे फोटो रोल्स व्हिडिओ कैसेट वगैरे सगळे इथेच सोडून जायचं. चीनमध्ये जाताना फक्त कोरे रोल्स नेता येतात.
चीनमध्ये कैलास पर्वताच्या परिक्रमेत आणि मानस सरोवराच्या परिक्रमेत जे कॅम्प आहेत त्यात पंधरा ते सतरा लोकांची राहायची सोय असल्याने आपल्या यात्रेकरूंचे दोन ग्रुप केले जातात. एक ग्रुप कैलास परिक्रमेला जातो त्याच वेळी दुसरा ग्रुप मानस परिक्रमेला जातो आणि नंतर कैलासचा मानसला आणि मानसचा कैलास ला अशी अदलाबदल होते. भारतातल्या यात्रेत भारत सरकार आपल्या यात्रेकरूंची खूपच काळजी घेतं. वैद्यकीय मदत वगैरे सगळं असतं; पण चीनमध्ये मात्र यातली कुठलीच सुविधा नसते. विशेष वैद्यकीय मदत मिळणं फारच मुश्कील असतं. यात्रेकरूंचं दिल्लीला जे सिलेक्शन होतं त्यावेळी प्रत्येक बॅचमध्ये निदान दोन-चार यात्रेकरू डॉक्टर असतील कटाक्षाने पाहिलं जातं. कारण हे डॉक्टर सहयात्री हेच आपल्याला वैद्यकीय मदत देऊ शकतात.
म्हणून दिल्लीहून निघतानाच जास्तीची औषधं, बँडेज, वगैरे घेतलेलं असतं. नवीडांगला असेच आमचे दोन ग्रुप्स करण्यात आले. आमच्या ग्रुपमध्ये शिंदे डॉक्टर कुटुंब तर दुसर्या ग्रुपमध्ये डॉक्टर पारीख होते. हे दोन्ही जिवलग मित्र. एकत्र यात्रा करण्याच्या अटीवर आलेले पण केवळ यात्रेकरुंच्या मदतीसाठी त्यांना ताटातूट सहन करावी लागली. डॉक्टरांची आम्हा सगळ्या यात्रेकरूंना खूपच मदत झाली.

नवीडांग ते लिपुलेख बॉर्डर ते तकलाकोटपर्यंतचा प्रवास. सकाळी साडेतीनलाच उठलो आणि सगळ्या ग्रुप एक कतारीत आणि चार वाजता निघाला. आजचा प्रवास हा आतापर्यंतचा सगळ्यात खडतर प्रवास. सकाळी अंधारात चक्क बॅटरीच्या प्रकाशात मार्गक्रमण. नवीडांग तेरा हजार आठशे फुटावरून लीपूलेख सतरा हजार पाचशे फुटावर म्हणजे तीन हजार सातशे फूट उंचीवर जायचं. निघतानाच पाऊस सुरू झाला होता. अंधारात प्रवास, हवा विरळ; ऑक्सिजन कमी. अंतर सातच किलोमीटर. पण फारच कठीण. लिपूलेख पास ही भारत-चीनची सरहद्द. आजूबाजूला प्रचंड बर्फ, प्रत्येकालाच त्या वातावरणाचा त्रास होतो. हातपाय गार पडतात, उलट्या होतात, डोकं गरगरायला लागतं.
सकाळी चारला जे निघालो. लीपुलेखला. आमच्याबरोबर एक ज्योतीबेन गुजरातच्या अनवाणी यात्रा करत होत्या. नंतर नंतर त्यांचे पाय रक्ताळायचे. पायाला फडकं बांधायची. तरीही तिने तिचा हेका सोडला नाही. मिलिटरीच्या जवानांनी पहाटेच्या प्रवासात मात्र तिला जबरदस्तीने घोड्यावर बसवलं. असं काही चालता येणार नाही; अनवाणी तर नाहीच नाही. नाहीतर परत जा. तिने खूप तुफान केलं; पण त्यांनी काही एक ऐकलं नाही. मग तिला हट्ट सोडावाच लागला.
उभा चढ आहे. मिलिटरीच्या डॉक्टरांना याची पूर्ण कल्पना असल्याने जवान तुमच्या हातापायाला मसाज करून ऊब आणतात. औषध देतात आणि महत्त्वाचं म्हणजे धीर देतात. वरून पाऊस, खाली बर्फ, अंगावर प्रचंड कपडे. आसरा हद्दीवर आपले घोडेवाले, हमाल, मिलीटरीचे जवान, डॉक्टर, वायरलेस हा सगळा ताफा भारताच्या हद्दी मध्येच राहतो. चीनमध्ये फक्त यात्री आणि भारत सरकारचा प्रतिनिधी म्हणजे आपल्याबरोबर दिल्लीहून आलेला संपर्क अधिकारी. या वेळी एक बॅच चीनमधून भारतात यात्रा संपवून प्रवेश करते आणि एक ग्रुप भारतातून चीनमध्ये प्रवेश करतो. ही बॅचेसची देवाणघेवाण भारत चीन सरहद्दीवर होते.

येणारे आणि जाणारे यात्रेकरू एकमेकांना अतिशय प्रेमाने आलिंगन देतात; एकमेकांची विचारपूस करतात. परत जात असलेल्या यात्रेकरुंमध्ये महाराष्ट्राचं कोणी आहे का? नाशिकचं कोणी आहे? का असं विचारल्यावर पुण्याचे यात्री भेटले. त्यांना नाशिकचा आमच्या घरचा फोन नंबर दिला आणि सांगितलं की नाशिकला कळवा की आमची सरहद्दीपर्यंतची यात्रा सुखरूप झालेली आहे.
चीनमध्ये प्रवेश केल्यावर अगदी उताराचा रस्ता आहे. तिथे बर्फावरून चालण्याचा, घसरण्याचा, पडण्याचा अनुभव आला. बराचसा उताराचा रस्ता पार केल्यानंतर चिनी घोड्यांवर सक्तीने बसावं लागतं. मी ज्या घोड्यावर बसलो त्याची मालकीण आरामात लांबून चालत होती. पहिला झटका तिथेच बसला. भारतातले घोडेवाले तुम्हाला खूपच मदत करतात. बरोबर चालतात तुम्हाला भीती वाटू नये म्हणून. तुमची एखादी बॅग धरतात; पाण्याची बाटली घेतात. पण चिनी घोडेवाल्यांना अजिबात सोयर-सुतक नसतं. थोडं अंतर गेल्यावर घोड्याने मला धाडकन खाली आपटलं. कारण त्याची मांड बांधलेलीच नव्हती. ती निसटली आणि मी भुईसपाट झालो. असाच अनुभव इतरांनाही आला. साधारण पाच किलोमीटर घोड्यावरचा कठीण प्रवास केल्यावर आम्ही बसजवळ पोहोचलो. आमचं सगळं सामान एका उघड्या ट्रकमध्ये आणि आम्ही यात्रेकरू त्या बसमध्ये. रस्ता हा प्रकारच नव्हता. खाच खळग्यातून, नदी नाल्यातून, दगड धोंड्यातून ती बस शरीरातल्या प्रत्येक हाडाची परीक्षा घेत शेवटी एकदाची तकलाकोटला पोहोचली. प्रचंड धूळ, कडक उन्ह अशा वातावरणात तकलाकोटला आमचं आगमन झालं. गेल्यावर चिनी चहा पिऊन, आमच्या सामानाची तपासणी, पासपोर्टवर शिक्के, कॅमेऱ्यांची तपासणी होऊन आम्ही आम्हाला दिलेल्या खोल्यांमध्ये आलो. तकलाकोटचं पुरंग हे गेस्ट हाऊस तसं बरं आहे. प्रत्येक खोलीत पाच जण, प्यायला गरम पाणी, पन्नास वर्षांपूर्वीच्या पद्धतीचे टोपली संडास की ज्याची सफाई बहुदा वर्षातून एकदाच होत असावी. नाक दाबल्याशिवाय प्रवेश करू शकत नाही. त्यांच्या जीवनाच्या आणि इतर सर्वच वेळा ते तंतोतंत पाळतात. आम्ही तिथे पोहोचल्यावर जेवणाची वेळ टळून गेली असल्याने बरोबर आणलेला फराळावर जेवण आटोपलं.

रात्रीचे जेवण म्हणजे बोरासारखी, लिचीसारखी फळं, भात सूप वगैरे. तसं चांगलं जेवण होतं. तकलाकोट तेरा हजार पाचशे फूट उंचीवर आहे. पण कडक ऊन्ह आणि प्रचंड धूळ यामुळे त्रास होतो. हे एक लहान शहर आहे. तिथूनच कैलास-मानसला जाता येत असल्याने बाजारपेठ आहे. तिथे अनेक वस्तू मिळतात. विशेषत: मानस सरोवराचं तीर्थ आणण्यासाठी प्लॅस्टिकच्या कॅन्स इथे घेतात. आम्ही बाजारात चक्कर मारली. गेस्ट हाऊसच्या शेजारीच बँक आहे. थोड्या अंतरावर कस्टम हाऊस आहे. दोन्ही ग्रुपसाठी एक एक तिबेटियन गाईड असतो. त्याला तोडकंमोडकं इंग्रजी आणि हिंदी येत असतं.
चीनमध्ये असेपर्यंत तोच आपला मार्गदर्शक, मित्र, सगळा संपर्क त्याच्यामार्फतच. इथून आपल्याला भारतात फोन करता येतो. दिल्ली सोडल्यानंतर धारचुलाहून म्हणजे प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी आपण फोन करू शकतो. नंतर थेट प्रवासाच्या अकराव्या दिवशीच. मधले नऊ दिवस जगाशी कुठलाही संपर्क नाही वर्तमानपत्र नाही; टीव्ही नाही, बातम्या नाही; फोन नाही. रोज सकाळी उठायचं आणि चालायला जायचं. जेवायचं आणि झोपायचं एवढाच कार्यक्रम. आमच्याबरोबरच्या मद्रासच्या विजयंमा यांनी त्यांच्या आईला फोन केला. त्या इकडून ‘अम्मा अम्मा’ आणि त्यांची आई तिकडून ‘विजया विजया’ पूर्ण तीन मिनिटं एवढ़ंच बोलत राहिल्या. कारण त्यांना एकमेकीशी काय बोलावं तेच सुचत नव्हतं. सगळ्यांची जवळजवळ तीच परिस्थिती होती.
तकलाकोट. आजचा दिवसाचा आरामाचा दिवस. आज बँकेतून डॉलर्स घेऊन चीनी युआन घेतले. चार रुपये पन्नास पैशाला एक युआन. इथे खर्च करायला वावच नाही; पण पुढे याका नि घोडेवाल्यांना देण्यासाठी चीनी चलन पाहिजे. आज पुन्हा बाजारात चक्कर. आजचा दिवस चीनने तिबेट गिळंकृत केल्याचा चीन सरकारचा शासकीय समारंभ होता. तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम होते. या कार्यक्रमाला तिबेटी लोक फारच थोडे होते. पंचमी पोलिसांचा प्रचंड मोठा ताफा होता.

सकाळी लवकर उठून प्रवासाला निघालो. अंधारातच बसचा प्रवास सुरू झाला. आपापलं सामान आणि काठी घेऊन बसने तकलाकोट सोडलं. सकाळी उजाडल्यावर बस थांबली. खाली उतरून पाहतो तर समोर सूर्योदयाच्या प्रकाशात चकाकणारी गुरु-मंधाता डोंगराजीतली बर्फाच्छादित शिखरं, अतिशय वेधक दृश्य, नंतरचा प्रवास असाच दगडधोंड्यातून, नदी नाल्यातू, कुठलाही आखीव रस्ते नसलेल्या वाटेतून, रस्त्याने जाताना सगळीकडे अगदी रुक्ष, भकास, वाळवंटासारखंच, कुठेतरी दोन-चार घरांची वस्ती, त्याच्याजवळ थोडीफार झाडं आणि शेती, अन्यथा सगळीकडे वाळवंटंच. इतकी प्रचंड धुळ की नाकाला पांढरं फडकं (डॉक्टर लोक ऑपरेशनच्या वेळी बांधतात तसं) बांधल्याशिवाय श्वासच नाही घेता येत. कडक ऊन्ह, धूळ पण थंडी सुद्धा.
१६२०० फुटावर गुरला पास ओलांडल्यानंतर पहिलं दर्शन होतं ते राक्षसताल सरोवराचं. या ठिकाणी आमची बस थांबली. राक्षसताल सरोवराच्या काठापर्यंत आम्ही गेलो पण आमच्या गाईडने त्या पाण्याला स्पर्श करू दिला नाही. ते पाणी कडू आहे आणि त्याला स्पर्श करणं अशुभ आहे असं त्याने सांगितलं. या ठिकाणी रावणाने भगवान शंकराची आराधना केली. आपल्या आतड्याची वीणा वाजवून शंकराला प्रसन्न केलं. शंकर प्रसन्न झाल्यावर रावणाने शंकराजवळ आपल्या राज्यात कैलास पर्वत उचलून नेण्याची परवानगी मागितली, जेणेकरून भगवान शंकराच्या दर्शनासाठी रावणाला इतक्या लांबपर्यंत यायला नको. रावणाने कैलास पर्वताला आपल्या बाहुंचा वेढा घालून उचलण्याचा प्रयत्न करताच शंकराने आपल्या पायाच्या अंगठ्याने रावणाचं मस्तक दाबलं आणि रावण थरथरत दूर फेकला गेला.
इथे दैत्य, असूर, राक्षस शंकराची पूजा-आराधना करत. राक्षसतालचा परिघ एकशे बावीस किलोमीटर आहे. पाणी शांत असून रंग काळपट आहे. राक्षसतालच्या वायव्येकडून सतलज नदीचा उगम होतो. राक्षसतालपासून थोड्या अंतरावर मानस सरोवर आहे. त्याचं दर्शन झाल्यावर डोळ्यातून पाणी यायला लागलं. ऊर भरून आला आणि वाटलं; ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास त्या पवित्र मानस सरोवराचं दर्शन या जन्मी आपल्याच डोळ्याने आपल्याला झालं याच्याएवढ़ं पुण्य ते कोणतं. इथे आमची बस थोडावेळ थांबली. तेवढ्यात काही लोकांनी मानस सरोवराच्या पाण्याला स्पर्श करून, डुबकी मारून घेतली. नंतर आमची बस हो रे या कँपवर गेली तिथे बी ग्रुप लागले. मानसरोवर परिक्रमेच्या ग्रुपला सोडून आमच्या ग्रुपला धारचेनच्या कॅम्पवर पोहोचवलं.
दारचेन हे १७ हजार फूट उंचीवर आहे. जुन्या पद्धतीच्या गावासारखा आहे. इथे एक भिंत (मातीचीच कंपाउंड वॉल) आहे, जिच्यातून प्रवेश करून कॅम्पवर जाता येतं. आम्ही दुपारी पोहोचलो. खोल्या म्हणजे ५-५, ७-७ लोकांची एक सोय. संडासाची सोय नाही. मोकळ्या मैदानात जावं लागतं. मी आणि आम्ही दोघं संडासला म्हणून बाहेर पडलो. भिंतीच्या आत असेपर्यंत आकाश निरभ्र, ऊन्ह अशी परिस्थिती होती पण आम्ही भिंतीच्या पलीकडे गेल्याबरोबर अचानक आकाशात ढगांचा गडगडाट, विजा चमकू लागल्या आणि चक्क पावसाला सुरुवात झाली. चांगल्या बोराएवढ्या गारा पडू लागल्या. आम्ही खूप घाबरलो. कपडे ओले चिंब झाले. धावतपळत आम्ही भिंतीच्या आत आलो आणि काय आश्चर्य? जणू काही घडलंच नाही.

आमच्या मित्राने विचारलं की पलीकडच्या नाल्यात काय आंघोळ वगैरे करून आलात की काय? ओले कसे झालात? तर त्यांना आम्ही आमची कहाणी सांगितली. शेजारीच उभ्या असलेल्या आमच्या चिनी गाईडने सांगितलं की यात काहीच आश्चर्य नाही; असं घडतं. परमेश्वर तुम्हाला घाबरतो. तुमची परीक्षा पाहतो. कॅंपवरून आम्ही कैलास पर्वत कुठे दिसतो का ते पाहिलं पण दर्शन झालं नाही. समोर मात्र गुरला मंधाता पर्वतराजीचं अतिशय विहंगम दृश्य दिसत होतं. सगळीकडे बर्फाच्छादित शिखरं, पांढरा ढगांचा लपंडाव, खूपच सुंदर अप्रतिम दृश्य होतं. रात्री पहिल्यांदा आम्ही स्वतः म्हणजे ग्रुपचा एकत्र स्वयंपाक केला. मिल्कमेड पावडरच्या दुधाचा चहा केला होता. प्रीकुक्ड राईस जो दिल्लीहून नेला होता त्याचा भात केला. आताच्या काळात इंन्स्टन्ट फूडचं, मिल्कपावडरचं काही नवल वाटत नाही. त्या काळात त्या सवयीच्या गोष्टी नव्हत्या.
चिनी सरकार आपल्याला फक्त एक पेट्रोलचा स्टोव्ह देतं आणि गरम पाणी (स्वयंपाक आणि पिण्यासाठी फक्त) देतं. ते जेवण म्हणजे केवळ उदरभरण; यापेक्षा दुसरा हेतू नव्हता. हवा अगदी थंडगार होती. त्याचवेळी नेपाळमार्गे खाजगी यात्राकंपनीच्या यात्रेकरुंचा एक ग्रुप आला. ते जीपने काठमांडूहून चार-पास दिवस प्रवास करून आलेले होते. प्रत्येकाच्या अंगावर प्रचंड कपडे होते तरी ते थंडीने कुडकुडत होते. आम्ही मात्र साध्या कपड्यात होतो. त्या लोकांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं की तुम्हाला थंडीचा त्रास होत नाही का? आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही दिल्लीहून निघून टप्प्याटप्प्याने रोज चालत आहे आणि रोज उंची गाठत प्रवास केला असल्याने आमच्या शरीराला हळूहळू या वातावरणाची सवय झाली आहे; म्हणून आम्हाला त्रास होत नाही. तुम्ही अगदी कमी दिवसात वाहनाने कुठलेही शारीरिक श्रम न करता एकदम प्रतिकूल वातावरणात आला आहात म्हणून तुम्हाला त्रास होतोय.
हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. भारत सरकारतर्फे या यात्रेला येण्यात कुठलाही धोका नाही, त्रास नाही. कारण ही सबंध यात्रा टप्प्याटप्प्याने होत असते आणि तुमचं ,शरीर तुमचं मन, तुमची इच्छाशक्ती दिवसागणिक प्रबळ होत जाते. आलेल्या यात्रेकरूंना भयानक त्रास होतो. काही मरण पावतात. शक्यतो फारच थोडे लोक प्रत्यक्ष कैलासाची आणि मानसची परिक्रमा करतात. ते फक्त लांबूनच दर्शन घेतात. पण भारत सरकारचा यात्रेतील प्रत्येक जण या परिक्रमा हमखास करतातच पण पूर्ण करतात हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो. हा माझा अनुभव मी जेव्हां माझ्या नेपाळच्या मित्रांना सांगितला आणि मी या प्रवासाचं व्हिडिओ शूटिंग जेव्हा दाखवलं तेव्हा नेपाळचे रहिवासी माझे मित्र भारतातून भारत सरकार मार्फत घडवल्या जाणाऱ्या या यात्रेत सहभागी होऊ इच्छित आहेत.

दारचेन कॅंपला सकाळी उठून चहा घेऊन आम्ही १७ जणांचा ‘ए’ ग्रुप पायी कैलास परिक्रमेला निघालो. साधारण सहा किलोमीटर अंतर चालून गेल्यावर यमद्वार लागलं. असं म्हणतात की या द्वारातून गेलं तर मरणाची भीती वाटत नाही पण आम्ही यात्रेच्या पहिल्या दिवसापासूनच एवढ्या कठीण आणि खडतर प्रवास केलेला होता की रोज आम्हाला पावलोपावली मरण डोळ्यासमोर दिसत होतं. त्यामुळे मरण्याची भीती ही कशी राहिली नव्हती. पुढे ल्हाच्छू नदीच्या पात्रात आम्ही सगळे थांबलो. बर्फात आणि अति उंचावरच्या प्रदेशात चालणारा प्राणी याक आम्ही घेतला होता. तेही लोक आले. या ल्हाच्छू नदीपात्रातून आम्हाला कैलासाचं प्रथम दर्शन झालं.
त्रिनेत्रधारी शंकर भगवान दर्शन! या एका सुवर्ण क्षणांसाठी घरापासून दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर गेल्या चौदा दिवसांच्या खडतर प्रवासानंतर आलेला हा सुवर्णक्षण स्वतःच्याच भाग्याचा हेवा वाटावा असा हा सुवर्णक्षण. त्या कैलास पर्वताचं, यावर समुद्रमंथनातून निघालेल्या विषाचा प्याला प्यायलेल्या आणि अंगाची आग शांत करायला आलेल्या शंकराच्या निवासस्थानाचं प्रत्यक्ष याची देही याची डोळा दर्शन! आज जीवनाचं सार्थक झालं. परमेश्वर किती महान आहे आणि आपण मनुष्यगण किती क्षुद्र आहोत याची प्रचिती देणारा हा अनुभव. फारच थोड्यांच्या नशिबात असलेला हा योग.
कैलास पर्वताची उंची २२ हजार १०० फूट. याचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या आजूबाजूचे सगळे पर्वत तपकिरी रंगाचे आहेत. फक्त कैलासचं काळाकभिन्न रंगाचा आहे. पायथ्यापासून उंच. जणू काही अगदी उभा कडा. (दौलताबाद किल्ला, देवगिरी किल्ल्यासारखा) त्याला शंकर भगवानाचा खांदा समजला जातो. त्यावर शिर आणि दोन नेत्र, भुवया आणि भुवयांची सावली डोळ्यावर पडलेली. दोन नेत्रांबरोबर तिसरा नेत्र (बायका टिकली लावतात त्या ठिकाणी). त्यावर उभे कपाळ, मागच्या बाजूला झुकलेल्या जटा. पांढराशुभ्र चांदीसारखा चकाकणारा चेहरा. सुरुवातीला नेत्रांच्यावर काही दिसेना. हळूहळू ढग दूर बाजूला सरू लागला आणि शंकराचं पूर्ण रूप नजरेत भरू लागलं.
काय तो देखावा. ढगांशी लपाछपी चालू होती. खूप अंतर असल्याने उघड्या डोळ्याने फारसं स्पष्ट दिसत नाही. दुर्बिणीतून स्पष्ट रूप दिसू शकलं, तेही थोडा वेळच, त्यानंतर सगळंच काही ढगाआड लपलेला जणू शंकराने थोडावेळ दर्शन देऊन तपश्चर्येसाठी माघारी गेले असावेत. त्रिनेत्रधारी भगवान शंकराचं प्रत्यक्ष दर्शन या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पुण्य. याच्यापुढे सगळं काही थिटं. परमेश्वराला साष्टांग दंडवत घालून ते सोजळ डोळ्यात घेऊन आम्ही पुढच्या परिक्रमेला सुरुवात केली. हे रूप उत्तर भागाकडून दिसतं.
लाच्छू नदीच्या पात्रातून मार्ग होता. काही ठिकाणी पाण्याचे प्रवाह ओलांडावे लागले. आम्ही सतरा हजार फूट उंचीवर होतो. रस्ता खडतर होता. दुपार टळली होती. पूर्वेच्या बाजूने मार्गक्रमण करत होता. याकवर आरोहण करायचं. याक मोठ्या आडदांड रानटी बैलासारखा प्रचंड केसाळ प्राणी. अत्यंत निर्बुद्ध प्राणी. चार-पाच लोकांना न आवरणारा. त्याच्यावर आरूढ होणं हा एक सोहळाच. पुढच्या शिंगांनी दोघांनी धरायचं. मागून दोन जणांनी आपल्याला उचलून त्याच्यावर बसवायचं. निदान तीन-चार वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याच्यावर बसता यायचं.
हा प्राणी पाठीमागे निमुळता, सरळ उभा राहिला तरी आपण पाठीमागे निसटतो. त्याची मान अतिशय लहान; तिला घट्ट धरून बसायचं. थोडा जरी चढ आला तरी आपण मागे मागे सरकतो, निसटतो आणि खाली पडतो. बरं हे याकवाले एकदा बसवून दिलं की जणू काही त्यांचा संबंध नाही. अगदी अलिप्त. आपण कितीही ओरडा, हाका मारा. किंचाळा पण जोपर्यंत आपण पडून जमिनीवर आपटत नाही तोपर्यंत ते तुमच्याजवळ येणार पण नाहीत. हे याक कधीच सरळ चालत नाहीत. रस्ता सोडून तिकडे धावत सुटणार. एकमेकांशी लढाया करणार आणि आपण वर मान घट्ट धरून करून, घावरून, डोळे मिटून बसून राहणार किंवा खाली पडणार. कुठे गवत दिसलं की चाललाच याक गवताकडे. दोन याक एकमेकांना घासतच चालणार. केवळ अगदीच नाईलाज झाला तरच याकची सफर करावी अन्यथा पायीच चालणं हे सर्वांत उत्तम, निर्धोक आणि कमी त्रासाचं. पण उभा चढ, अति उंचावर असल्याने ऑक्सिजन कमी, दोन पावलं चाललं तरी दम लागणार; म्हणून नाईलाजाने यावर बसावं लागतं. पूर्वेकडून जात असल्यामुळे, नदीपात्रात रस्ता असल्याने संध्याकाळी लवकरच अंधार जाणवायला लागला. कैलासाची पूर्व बाजू. कुठे अगदी एकदम काळाकभिन्न पहाड तर कुठे बर्फ वरून खाली घरंगळतोय, वेगवेगळे नजारे. अंधार पडल्यावर कॅम्पवर जाऊन पोहोचलो. याकवरच्या थोड्याशाच सफरीने मांड्या दुखायला लागल्या होत्या. याकवरची सफर भयानक असते.
हवा विरळ आणि थंड. त्याचा मात्र आम्हाला त्रास झाला. कॅंपवर कसातरी ‘स्वयंपाक’ करून दोन घास पोटात ढकलून जमिनीला पाठ लावली आणि तत्काळ निद्राधीन झालो. पहिल्या दिवसाची परिक्रमा जवळजवळ बावीस किलोमीटरची झाली.

सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी कैलास पर्वताच्या बर्फावर सूर्योदयाची पहिली किरणं जेव्हा पडतात तेव्हा अगदी सोनेरी रंगाचा होतो. त्या गोल्डन कैलासाचं दर्शन काहीजणांना झालं. आम्हाला थोडा उशीर झाल्याने ते होऊ शकलं नाही हे आमचं दुर्दैव. कैलास परिक्रमेचा दुसरा दिवस आणि या पूर्ण यात्रेतला सगळ्यात कठीण प्रवासाचा दिवस. सकाळी लवकर निघून उभा कडा चढावा लागतो. आपण सगळ्यात उंच ठिकाणी म्हणजे परिक्रमेच्या १९५०० फुटांवर डोलमा पास इथे येतो. प्रचंड मोठे दगड आणि शिरा यांच्यातून रस्ता काढत, हवा अतिशय विरळ, ऑक्सिजन कमी, खूप दम लागतो. पण इथेच शंकराची पूजा आणि हवन केलं जातं. तिथे कुठलंही देऊळ नाही. ही साधारणतः दक्षिण बाजू, कैलासच्या पाठीमागे प्रचंड मोठं ग्लेसियर दिसलं. साधारण एक तास थांबून आम्ही डोलमा पास उतरायला लागलो.
जवळच गौरीकुंड आहे. बर्फाळ हिरव्या रंगाचं पाणी. हे पार्वतीमातेचं कुंड आहे. इथे आम्हाला बर्फावरून चालावं लागलं. वरून बर्फ आणि त्याच्या खाली पाणी वाहतं. एका ठिकाणी पाण्याची चारी, बर्फ फाटल्याने झालेली ओलांडावी लागली. तिथे मात्र प्राण कंठाशी आले. उडी मारायची आणि उडी अपुरी पडली किंवा पाय घसरला तर पंधरा ते वीस फूट खोल पाण्यात. कोणीही वाचवायला येणार नाही. परमेश्वराची आराधना चालू होती. प्रत्येक श्वासागणिक ‘ओम नमः शिवाय’चा जप चालू होता. कोणालाही त्रास न होता आमचा बर्फावर छोटा प्रवास सुखरूप पार पडला. सबंध डोंगर उतरून आम्ही दुपारी नदीपात्रात आलो. तिथे फराळ केला आणि पुढचा आमचा मार्ग धरला. रात्री पोहोचलो. या सबंध प्रवासात आम्हाला यात्रेकरूंशिवाय आणि याकवाल्यांशिवाय कोणीही नव्हतं. रात्री प्रचंड हवा चालू होती. खूप थंडी होती. जुटुलपुक कॅंपला पोहचायला रात्र झाली होती. आजचा प्रवासही सुमारे बावीस किलोमीटरचा झाला.

कैलास परिक्रमेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. एकूण बारा किलोमीटर रस्ता. जोंगछू नदीच्या काठाकाठाने पण कैलास पर्वतापासून थोडं दूर. अशा रस्त्याने हा साधासरळ प्रवास. कैलासच्या पश्चिमेकडून दारचेन कॅंपकडे परत दुपारी दारचेनला पोहोचलो. प्रत्येकजण कैलासची परिक्रमा सुखरूप पार पडल्याच्या अत्यानंदात परमेश्वराचे आभार मानून एकमेकांना आलिंगन देत आनंदात सहभागी होत होते. एक साफल्याचा आनंद. सगळा श्रमपरिहार झाला होता. अर्धी यात्रा सफल झाली होती. गुरला मंधाता पर्वतांच्या बर्फाच्छादित शिखरांचं दर्शन घेत संध्याकाळी एकत्र गप्पा मारत बसलो. रात्री दारचेनला मुक्काम केला.
कैलास पर्वताला मेरू पर्वत असंही संबोधलं जातं. तसंच या विश्वाचा मध्य (सेंटर) समजलं जातं आणि सगळं ब्रह्मांड याभोवती फिरतं असं मानतात. कैलास पर्वत म्हणजे स्वर्गाला चुंबणारं, उगवत्या सूर्यासारखं तेजस्वी, धूर विरहित अग्निसारखं, मोजता न येणारं आणि जवळ जाता न येणारं; असं स्थान मानलं जातं. याचा दाखला शिवपुराणातल्या तेराव्या अध्यायात; तसंच स्कंद पुराणात, रामायण-महाभारत, तसंच कालिदासाच्या कुमारसंभवम् मध्ये तसंच इतर अनेक धर्मग्रंथात मिळतो. तिबेटी लोक एकाच दिवसात कैलासची परिक्रमा करण्याचा संकल्प करतात आणि त्याला १२ ते १७ तास लागतात. तिबेटी लोक साष्टांग दंडवत घालत सुद्धा ही परिक्रमा करतात. ही शारीरिक दृष्ट्या अतिशय त्रासदायक असते; पण त्यांना ही परिक्रमा करताना आध्यात्मिक पुनर्जन्म झाल्याची अनुभूती मिळते असं समजतात. कैलासच्या तीन अथवा तेरा परिक्रमा करणं हे अतिशुभ मानलं जातं. अकरा परिक्रमेनंतर अंतरकैलासला जाण्याची मानसिक दृष्ट्या तयारी होते. असं गेलेलं कोणी पाहण्यात किंवा ऐकिवात नाही. कैलासावरून चार नद्या उगम पावतात. त्यामुळे उत्तरेकडे सिंधू पूर्वेकडे ब्रह्मपुत्रा पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे करनाली.
कैलास मानस सरोवर हे तिबेटमध्ये आहे. १९८१ पासून ही यात्रा भारत सरकारच्या चीन बरोबरच्या अनेक दिवस वाटाघाटी केल्यानंतर सुरू झाली आणि त्यानंतर १४ ते १६ बॅचेस दरवर्षी जात असतात.
कैलासाचं दर्शन झाल्यानंतर आणि या निसर्गातल्या प्रवासाने एक गोष्ट नक्कीच जाणवते की या सबंध ब्रह्मांडाच्या संदर्भात माणूस किती क्षुद्र आहे, लहान आहे. यात्रेमुळे आपलं स्वतःचं अस्तित्व असून नसल्यासारखं वाटतं. कैलास पर्वतावर आपली कुठलीही आवडती गोष्ट सोडावी, त्यागावी असं म्हणतात. माझ्यासारख्या संतापी आणि तापट माणसाने त्या ठिकाणी याचा त्याग केला पण खरं पाहिलं तर यासंबंधी यात्रेमुळे आपल्या सूक्ष्मतेची एवढी जाणीव होते की कसला राग, संताप, द्वेष, मत्सर, लोभ या सगळ्याच्या पलीकडे आपण जाऊन बसतो.
मानससरोवर परिक्रमा आटोपून ग्रुप ‘बी’च्या यात्रेकरूंना घेऊन उघडा ट्रक दारचेनला आला. त्यांना तिथेच सोडलं आणि आमचा ग्रुप मानससरोवर परिक्रमेकरता होरेच्या कॅम्पला आला. रस्त्याने इतकी प्रचंड धूळ होती आणि ट्रकमधल्या प्रवासाने अंग चांगलंच ठेचून निघालं होतं. या कॅंपच्या जवळच चिनी सरकारच्या मिलिटरी कॅम्पचं बांधकाम चालू आहे. त्यामुळे कॅंपच्या बाहेर पडायलाही बंदी आहे. मला तर भीती वाटते की हा मिलिटरी काम पूर्ण झाल्यानंतर चीन सरकार कदाचित मानस सरोवराच्या परिक्रमेला बंदी आणेल की काय? कॅम्पला आल्यावर खाणं आटपलं. मुक्काम मातीच्या भिंतीच्या कॅम्पमधेच.

मानस सरोवर परिक्रमेचा पहिला दिवस, अंदाजे ४० ते ४५ किलोमीटर चालावं लागणार आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी सुरुवात केली. मानस सरोवराच्या काठाकाठाने ही परिक्रमा होते. तिथे बसायला घोडे मिळू शकतात. मानस सरोवर पंधरा हजार फूट उंचीवर आणि कैलास पर्वताच्या पश्चिमेला साधारण चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. मानस सरोवर हे जगातील सर्वांत उंच ठिकाणावरचं निसर्गरम्य नैसर्गिक सरोवर. याची निर्मिती ब्रह्माच्या मस्तिष्काशी जोडलेली आहे. याचा शोध राजा गुरला मंधाताने लावला अशी समजूत आहे. सरोवराचा परिघ जवळजवळ ९० किलोमीटर असून त्याची खोली ९० मीटर तीनशे फुटापर्यंत आहे आणि पूर्व क्षेत्र अंदाजे तीनशे वीस चौरस किलोमीटर आहे. मानस सरोवर आणि राक्षसताल हे एक नैसर्गिक गंगाछ्यू कालव्याने जोडलं गेलं आहे. या क्षेत्रातून उत्तर भारतातल्या चार मोठ्या नद्या-करनाली, सतलज, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू या उगम पावतात. परिक्रमा करताना या नद्या ओलांडाव्या लागतात. रस्त्याने बौद्ध भिक्षुकांचे मठ लागतात.
मानस सरोवराचं पाणी हे अतिशय गोड, काचेसारखं निर्मळ आहे. त्याला अमृतच समजलं जातं. कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही. त्यामुळे सर्व घराचा तळ अगदी काचेसारखा दिसतो. हलके तरंग उठत राहतात. त्यांचा त्या शांत वातावरणात मधुर आवाज येत राहतो. इथे दुपारी अतिशय कडक ऊन्ह असतं; त्यामुळे आपली कातडी काळी पडते पण त्याचबरोबर थंड हवाही चालू असते. होरेच्या कॅंपहून सकाळी मानसच्या पश्चिम किनाऱ्याने सेरालुंग आणि येरंगो मठ पार करून रात्री मुक्कामाला टुगो मठाजवळच्या कॅम्पवर पोहोचलो.

मानस सरोवर परिक्रमेचा दुसरा आणि शेवटच्या दिवशी अंतर तीस ते पस्तीस किलोमीटर. सकाळी लवकर सूर्योदय होतो. मानस सरोवराच्या पाण्यातून सूर्य वर येतो. त्याची तांबूस प्रभाव सर्व पाण्यावर पसरते. तसंच आकाशात सगळीकडे लालिमा पसरतो. सूर्य जसा वर यायला लागतो तसतसे सरोवराच्या पाण्याचे रंग भराभर बदलत जातात. पांढऱ्या भुरकट रंगाच्या ढगांची धावाधाव चालू असते. कन्याकुमारीच्या सूर्योदय, दार्जिलींगचा सूर्योदय किंवा अशा कुठल्याही प्रसिद्ध सुर्योदयाइतकाच या सगळ्या सूर्योदयाचं रूप आगळं-वेगळं आहे.
सुदैवाने माझ्या व्हिडिओ कॅमेरामध्ये त्या सूर्योदयाचं अतिशय उत्कृष्ट चित्रण झालं. या प्रवासात पाण्यात खूप वेगळ्या रंगाच्या, रूपाच्या, जातीच्या, आकाराच्या पक्ष्यांचे दर्शन होतं. मला एक सोनेरी रंगाच्या खूप मोठ्या पक्ष्यांची जोडी दिसली. मानस सरोवरामध्ये राजहंस पक्षी राहतात ते नलदमयंती काव्यापासून ऐकलं होतं. पण आम्हाला दिसला नाही. उन्हाळा त्यांना सहन होत नाही म्हणून ते स्थलांतर करतात असं कळलं. काही सुंदर फुलंही दिसली. रस्त्यात एका ठिकाणी खूप माशा दिसल्या. तो थोडा दलदलीचा भाग होता. आज कैलास पर्वताची पश्चिम बाजू आणि पूर्ण कैलास पर्वताचं दर्शन झालं. त्याचं वेगळंच रूप दिसलं. या अंतरावरून कैलास मेंढ्याच्या तोंडाच्या आकाराचा दिसतो. उत्तरेकडे जे नेत्र दिसलं होतं ते इथून नाकपुड्या सारखं दिसतं. वरचा भाग नाकासारखा, कपाळ हे डोक्यासारखं दिसतं. त्रिशूलाच्या आकाराचंही दर्शन होतं. कैलास मानसरोवराचं दर्शन आणि परिक्रमा हे अतिशय साधारण पवित्र मानलं जातं. यावर चार धर्माच्या लोकांचा विश्वास आहे. बोनपा म्हणजे तिबेटी लोक कैलासला नऊ मजल्याच्या स्वस्तिका सारखा मानतात; आणि दैमचौक आणि दोर्जे यांचं निवासस्थान मानतात. हिंदू लोक कैलासला भगवान शंकराचं निवासस्थान मानतात. बौद्ध धर्मीय कैलासाला बुद्धाचं आणि मणीपद्माचं निवासस्थान मानतात. जैन लोक त्यांचं पहिलं तीर्थंकर ऋषभदेव यांचं कैलासावरच निर्वाण झालं असं मानतात.

हिवाळ्यात ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत कैलास आणि गुरला मंधाता या पर्वतमाला पूर्ण बर्फमय होतात. एवढचं नव्हे तर मानस सरोवरही पूर्ण गोठून जातो. म्हणूनच जून ते सप्टेंबर हा यात्रेचा काळ असतो. दुसऱ्या दिवशी कैलासाचं, गुरला मंधाताचं दर्शन घेत घेत मानस सरोवराच्या काठाकाठाने परिक्रमा करत झैदीच्या कॅंपवर येतो. या कॅंपचा काठ लहान लहान दगडांनी भरलेला आहे. त्यात कोणाला भगवान शंकराची पिंड दिसते, कोणाला श्री गणेश दिसतो, कोणाला सर्पाने विळखा घातलेली शंकराची मूर्ती दिसते; तर कोणाला त्रिशूल. बरेच शाळीग्राम इथे सापडतात. कैलास-मानस या परिसराला देवभूमी म्हटलं जातं. म्हणून इथल्या सगळ्याच वातावरण अतिशय पवित्र मानलं जातं.
कैलासाची परिक्रमा करताना आपण पर्वताच्या लांबूनच जात असतो. असं म्हणतात की या पर्वतावर कोणी पाय ठेवू शकत नाही. ज्यांनीही प्रयत्न केला ते कधीच परत आले नाहीत. शंकराच्या निवासस्थानाला आपला पदस्पर्श होऊन आपण ते अपवित्र करू शकत नाही. कोणी काहीही म्हटलं आणि मानलं तरी कैलास पर्वताचा खालचा भाग चोहोबाजूंनी अगदी उभ्या तुटलेल्या कड्याचा असल्याने त्यावर चढणं अशक्य आहे. कोणी कैलास पर्वताला परिसाची उपमा देतात. रात्रीच्या नीरव शांततेत ओम नमः शिवायचे हुंकार ऐकू येतात असंही सांगतात. कोणाला मानस सरोवरातून त्रिशूल वर येताना दिसतं तर कोणाला पार्वती मातेचं दर्शन होतं.

रस्त्याने जाताना आपल्या शेजारून सुगंध दरवळल्याचा भास होतो. असं म्हणतात की तो सुगंध म्हणजे कोणी ऋषीमुनी किंवा देव हे मार्गक्रमण करत असतात. आम्हाला कोणालाही यातलं काहीही दिसलं नाही. ऑक्सिजनचा कमी पुरवठा झाल्याने हे भास होत असावेत. हॅल्यूसिनेशन हे शास्त्रीय कारणही कळलं. एक मात्र नक्की की वरच्या ढगांच्या प्रतिबिंबाने मानस सरोवराच्या पाण्याचे रंग सारखे बदलत असतात; आणि क्षणाक्षणाला बदलणारा या रंगांचा खेळ खूपच मोहक असतो. आम्हाला सकाळी पाण्यात पूर्ण ओमची प्रतिकृती दिसली. कैलासाचं प्रतिबिंबही सरोवराच्या पाण्यात दिसलं.
मानस सरोवर हे ब्रम्हाने निर्माण केलेलं सरोवर म्हणून त्याला ब्रम्हासर असंही म्हणतात. सानक, सानंदन आणि सुजात हे तीन साधू कैलास पर्वतावर भगवान शंकराची आराधना करत होते तेव्हा बारा वर्षांचा दुष्काळ पडला. आजूबाजूचे पाण्याचे प्रवाह वाहून गेले. त्यांना रोजच्या आंघोळीसाठी तसंच पूजाअर्चा करण्यासाठी खूप लांब असलेल्या मंदाकिनी नदीवर जावं लागत होतं. म्हणून त्यांनी ब्रह्माची आराधना केली आणि त्यांच्या तपश्चर्येचं फळ म्हणून मानस सरोवराची निर्मिती झाली. रस्त्याने जात असताना हनुमान गुहा लागते; तिथेही दर्शन घेतात. तिथे हनुमान राहतो अशी मान्यता आहे. काही लोकांना त्याचं दर्शनही झालेलं आहे. काहींनी त्याचे फोटोही काढलेत म्हणे. आम्हाला काही अनुभव आला नाही. आम्ही फक्त गुहेत जाऊन परत आलो. तिकडे एक किलोमीटरचा परिसर असा आहे. मानससरोवराच्या काठावरचा नेपाळी ब्राह्मण असतो तिथे दक्षिणा घेऊन हवन वगैरे केलं जातं आणि तिथे जे दगड आहेत प्रत्येक दगडावर शंकर गणेश यांच्या प्रतिमा शालिग्राम मिळतात. कुठेही पाय ठेवला तरी त्या दगडावर देव आम्ही दगड आणले. तिथून प्रत्येक लहान दगडावर देवाची प्रतिमा असते परिसरच त्या दगडांचा आहे.

आज आम्ही सगळे मानस सरोवरात स्नानाला गेलो. अगदी बर्फाचं पाणी, पाण्यात पाय टाकताच गुडघ्याच्या खाली पायच गायब झाल्यासारखं वाटलं. मग सर्वांगाला मोहरीचं तेल चोपडून थोडं मालीश करून देवाचं नाव घेऊन पाण्यात डुबकी मारली. तिर्थाच्या कॅन्स भरल्या. गौरीकुंडाचं तीर्थही आणलं होतं. पितरांना तर्पण केलं. कैलासाचं दर्शन घेत मानस सरोवराच्या काठी सगळ्यांनी विधिवत हवन-पूजन केलं. यात्रा सफल पूर्ण झाली. आज विश्रांतीचा दिवस!
आज गुरुपौर्णिमा. कैलास परिक्रमेच्या ‘बी’ग्रुपला दारचेन कॅंपहून घेऊन बस आमच्या झैदी कॅम्पला आली. आमच्याबरोबर तामिळनाडूचे एक मुख्याध्यापक होते. गुरुपौर्णिमेच्या शुभदिवशी आणि निमित्ताने मानसच्या काठावर आम्ही त्यांची पूजा केली. दोन्ही ग्रुप मिळून पुन्हा हवन पूजन केलं आणि अतिशय भरल्या अंतःकरणाने कैलास आणि मानस दोन्ही परिक्रमा सुखरूप पार पडल्याच्या आनंदाने परमेश्वराचे आभार मानून; त्याच्या अस्तित्वाला हृदयात सामावून आम्ही तकलाकोटच्या कॅम्पकडे प्रयाण केलं. कैलासाचं शेवटचं दर्शन घेताना डोळ्यातून अगदी घळाघळा पाणी वाहत होतं. आपल्या अत्यंत प्रियजनाच्या विरहाचं दुःख मनात होतं. पुन्हा आयुष्यात कधी कैलासाचं दर्शन होईल याची काय शाश्वती? पुन्हा कधी परमेश्वर बोलावेल तेव्हाच हे शक्य होईल. रात्री तकलाकोटला मुक्काम केला.
तिबेटमध्ये खोजारनाथ मठाला भेट देण्यासाठी ट्रकने गेलो. तिबेटमध्ये राम-लक्ष्मण-सीता अगदी उत्कृष्ट असं मंदिर आहे. कैलास दर्शनाला जाताना हे तिघं या ठिकाणी थांबले होते त्याची आठवण म्हणून हे मंदिर बांधलं आहे. त्याला भेट देऊन परत आलो.
आज शेवटचा दिवस. उद्या सकाळी भारतात प्रयाण करायचं. आज कस्टम्स वगैरेचे सगळे सोपस्कार पार पाडून सामान त्यांच्या ताब्यात दिलं. काहीजण शेवटची खरेदी करण्यासाठी बाजारात गेले. स्वेटर्स, विंडचिटर्स, शूज, चटया वगैरे खूप चांगला मिळतो. तिथे गेस्ट हाउसमध्ये शेवटचा दिवस म्हणून कॅम्पफायर केलं. त्यात गाईड आणि गेस्ट हाऊसच्या चीनी कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला.

अगदी सकाळी सूर्योदयाआधी बसने लीपूलेख पासकडे प्रयाण केलं. घोड्यांचा प्रवास, नंतर बर्फावरचा पायी प्रवास करून भारताच्या सरहद्दीवर आलो. येताना होतं तेच जाताना…. तिकडून पुढच्या बॅचचे लोक चीनमध्ये येत होते आणि आम्ही भारतात जात होतो. आमचे पहिले घोडेवाले, हमाल, डॉक्टर, जवान सगळे भेटले. आलिंगनं झाली. आमची यात्रा सफल झाल्याचा आनंद आमच्या चेहऱ्यावर आणि आमच्या सफलतेत त्यांचा हातभार लागला याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. खूप गप्पा मारत नवीडांगला पोहोचलो. आता मात्र ओम पर्वत शोधूनही सापडला नाही. ढगाआड लपल्याने त्याचं अस्तित्वही जाणवलं नाही. आम्ही खरंच किती भाग्यवान होतो की येताना ओम पर्वताने आम्हाला दिवसभर दर्शन दिलं होतं. आता परतीच्या प्रवासात एक एक कॅम्प टाळून जवळजवळ दुप्पट अंतर एका दिवसात पार पाडायचं होतं.
नवीडांगला जमा केलेले फोटोचे रोल्स घेतले; जेवण केलं आणि मुक्कामाला पुढच्या कॅम्पला म्हणजे कालापानीला गेलो. एकूण प्रवास १६ किलोमीटर झाला. आजचा संपूर्ण प्रवास तकलाकोट ते लीपूलेख आणि नवीडांग ते कालापानी हा फारच जास्त प्रवास होता पण परतीच्या मार्गाला लागल्याचं समाधान असल्याने ते जाणवलं नाही. येताना जे अनेक धबधबे दिसले ते आता गायब झाले होते. काही नवे धबधबे तयार झालेले दिसत होते.
कालापानी ते गुंजी. कालापानीला जमा केलेलं सामान घेतलं. गुंजीला पोहोचलो. तिथे भारताच्या साईडचं कस्टम चेकिंग झालं. मिलिटरीच्या डॉक्टरांना आणि जवानांना शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला. पूर्वीचे पीआरडीचे चार जवान, डॉक्टर, वायरलेस वगैरे गुंजीहून आमच्या पुढच्या प्रवासाला सोबत करू लागले.
गुंजी ते बुधी एकूण अंतर जवळजवळ एकतीस किलोमीटर. आज खूपच चालावं लागलं. बुधीला जेवण घेऊन तिथे न थांबता पुढच्या म्हणजे मालपाच्या कॅम्पला जावं लागलं. बुधी ते मालपामध्ये लॅंडस्लाईड नव्याने झालेल्या होत्या. तो १४ किलोमीटरचा प्रवास फारच खडतर होता. संध्याकाळ झालेली. अंधार झालेला आणि अशा त्या रस्त्याने प्रवास. त्याचा सगळ्यांना त्रास झाला.
मालपा ते गाला तोच धबधब्यांखालचा प्रवास. ज्या लॅंडस्लाईडने चिखलातला प्रवास करायला लावला होता तो चिखल आता एकदम कडक होऊन छान रस्ता झाला होता.
गाला ते सिरखा ते पांगू आजही एक कॅंप टाळून पुढच्या कॅंपला पोहोचायचं. २४ किलोमीटर येताना होते ते परतीच्या प्रवासात उतार आणि उताराच्या प्रवासात खूपच त्रास होतो. घोड्यावर बसता येत नाही. सिरखाला जेवण करून पांगूपर्यंत पोहचायला रात्र झाली. पाऊस पडत होता. रस्ता निसरडा झाला होता.

पांगू ते तवाघाट ते धारचूला. पांगूहून सकाळी निघून थानेधारकी चढाई उतरून तवाघाटला आलो. घोडेवाले आणि हमाल तिथेच सुटले. बसने धारचुलाला आलो. येताना आम्हाला प्रचंड थंडी वाजत होती त्याच धारचूलाला आम्हाला खूपच गरम वाटत होतं. कारण आम्ही आता हिमालयातून खाली आलो होतो. महिनाभराच्या रोजच्या बदलत्या वातावरणाने शरीर कणखर झालं होतं. सगळ्या पुरुषांच्या दाढ्या वाढल्या होत्या. वजन प्रत्येकाचं सात-आठ किलोने कमी झालं होतं. पॅंट्स कशाबशा पट्ट्याने आवळल्या होत्या.
ही संपूर्ण यात्रा इतकी कठीण, खडतर, इतके शारीरिक कष्ट देणारी होती पण कोणालाही असं कधीही वाटलं नाही की आपली चूक झाली किंवा चला, आता नको पुढे जायला, परत घरी जाऊया असा विचारही कधी मनात आला नाही. कारण ध्यास आणि एकच ध्येय, कैलास दर्शनाचं.
सबंध प्रवास झाला. धारचुलाला आल्यावर आमची घोडी होती जाताना लाली तिच्या संदर्भात नंतर कळलं की तिचा पाय घसरला आणि ती दरीत पडून मेली. येताना आमचं सामान दरीत पडलं; पण पडताना माझे रोल तेवढे वाचले. परमेश्वराचीच कृपा! नाहीतर माझ्या हाती काहीच लागलं नसतं. परत आलो तेव्हा बऱ्याच वस्तू वाटून टाकल्या. जाताना बरेच लोक देतात तिथे गरिबी भरपूर आहे. जो कोणी घोडा करत नाही त्यांना गरज लागली तरी घोड्यावर बसू देत नाहीत. घोडेवाले म्हणजे आपण जर म्हटलं माझ्या ऐवजी यांना बसू दे तर नाही देत बसायला. डॉ.शिंदे यांच्या पायाला जखम झाली. त्यांना घोड्याची गरज होती पण नाही मिळाला त्यांना घोडा; कारण त्यांनी आधीपासून घोडा केला नव्हता. एक तेवीस वर्षांचा मुलगा होता त्याने संपूर्ण यात्रा पार केली; पण शेवटी त्याला फार त्रास झाला. मात्र तेव्हा त्यालाही घोडा मिळाला नाही. शमूला एकदा घोड्याने लाथ मारली तेव्हा तिला मरणप्राय वेदना झाल्या होत्या.

धारचूला ते अलमोडा बसने प्रवास. येताना थोडंसं आडमार्गाला जाऊन पाताल भुवनेश्वर म्हणून एक शंकराचं स्थान आहे त्याला भेट दिली. हे स्थान पूर्णपणे जमिनीखाली ५२ फुटावर आहे. त्यात प्रवेश अगदी चिंचोळ्या नळकांड्यासारख्या गुहेतून आहे. तिथे पावसाने अतिशय निसर्ग झालं होतं. सरपटत जावं लागतं. कैलासला म्हणजे स्वर्गात जाऊन आल्यावर आता पाताळात गेलो. खाली पुराणातले वेगवेगळे दाखले आहेत. एकाच ठिकाणी बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथाच्या प्रतिकृती आहेत. तसंच चारी युगांच्या प्रतिकृती आहेत. शंकराची पिंड आहे आणि तिथे एक चमत्कार घडला. एक लहान बटू उघडा असा समोर आला. त्याने पाण्याची घागर माझ्या हातात दिली आणि मी आणि शमूने तिथे अभिषेक केला. नंतर तो मुलगा गायब! म्हणजे प्रत्यक्ष शंकर आला होता. मला दर्शन दिलं; माझ्या हातून अभिषेक करून घेतला आणि हे केवळ आमच्या बाबतीत घडलं. आणि काय योगायोग तो दिवस श्रावणी सोमवार होता. रात्री उशिरा अलमोडाला पोहोचलो.
अलमोडा ते दिल्ली सकाळी निघून रात्री ‘हॉटेल अशोक यात्री निवास’मध्ये पोहोचलो. तिथे यात्रेकरूंना घ्यायला मित्र नातेवाईक आलेले होते. आपल्या माणसाला जिवंत परत आलेल्या पाहून घ्यायला आलेले लोक आनंदाने अक्षरश: रडत होते; मिठ्या मारत होते. पुण्यात्मे म्हणून पाया पडत होते.
आम्ही दिल्लीला एक दिवस आधीच पोहोचलो; पण नाशिकचं परतीचं रिझर्व्हेशन आधीच केलेलं असल्याने एक दिवस दिल्लीत आराम केला. अकराला निघून बाराला पोहोचलो. स्टेशनवर घ्यायला आलेल्यांनी आम्हाला ओळखलंच नाही; कारण दाढी वाढलेली, वजन घटल्याने शरीर कृश झालेलं, रंग काळा पडलेला, गाल आणि ओठ फुटलेले, कसं ओळखणार?
या यात्रेची थोडक्यात माहिती अशी-
यात्रा १९५९ ते १९८१ बंद होती. १९८१ मध्ये पहिली बाजू गेली. दरवर्षी एकूण १४ ते १६ बॅचेस जातात. प्रत्येक बॅचमध्ये साधारणत: तीस ते पस्तीस लोक असतात. म्हणजे सबंध भारतातून साडेचारशेच्या आसपास लोक जातात. दिल्लीहून कैलासपर्यंतचं एकूण अंतर ८६५ किलोमीटर परिक्रमा धरून जाऊन-येऊन एकूण पायी-घोड्यावरचा प्रवास अंदाजे ३०० ते ४०० किलोमीटर.
दिनचर्या-रोज सकाळी साडे पाचला उठायचं. पहिला बेड टी घेऊन, सगळं आटोपल्यावर, चहा नाश्ता बॉनविटाचा मोठा ग्लास, देवाची आरती आणि रोज कॉल करून प्रवासाला प्रारंभ. निघताना अंगावरचे कपडे असे-साधा बनियन, त्यावर वुलनचा बनियन, त्याच्यावर शर्ट, नंतर हाफ स्वेटर, त्याच्यावर विंडचिटर, फुल रेनकोट, पायात साधे पायमोजे, त्याच्यावर वुलनचे पायमोजे, त्याच्यावर वुलनची पॅन्ट, डोक्याला कानटोपी, वऱ हॅट आणि हातात हात मोजे; हातात काठी असा युद्धाला निघाल्यासारखा पोशाख. प्रवास सुरू झाल्यावर अंगावरचा एक एक कपडा उतरायला लागतो. कारण आतून एवढ्या प्रचंड थंडीत घामाच्या धारा सुरु असतात आणि कॅंपला पोहोचेपर्यंत फक्त शर्ट-पॅंट अंगावर राहते. पोहोचल्यावर रसना किंवा तत्सम थंड पेयाने स्वागत होतं. दुपारच्या जेवणात पोळी भाजी, लोणचं पापड, भात-डाळ, संध्याकाळी चहा-बिस्किट, नमकीन वगैरे. रात्री जेवणाआधी मोठा ग्लास सूप. रात्रीच्या जेवणात पोळी, भाजी लोणचं, पापड, डाळ भात आणि एक मिठाई खीर, गुलाबजाम, रसगुल्ला वगैरे. पूर्णपणे शाकाहारी जेवण. रस्त्याने छोटी छोटी हॉटेल्स योग्य ठिकाणी म्हणजेच चढ संपल्यावर किंवा उतार संपल्यावर जेव्हा चहा मिळावा अशा योग्य वेळी आणि योग्य स्थळी.
कुमाऊ मंडळ विकास निगमचे कर्मचारी यात्रेकरूंची सेवा करण्याच्या भावनेने भारावलेले आणि अगदी मनमिळाऊ मदत करण्याची तयारी असलेले असतात. रस्त्याने भेटणारे आइटीबीपीचे जवान, छोट्या-छोट्या वस्त्यांवर लहान मुलं, म्हातारी माणसं आपल्या यात्रेच्या वाटेवर आपल्या स्वागताला येतात. ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राने एकमेकांना अभिवादन करतात. यात्रा पूर्ण करून आल्यावर परतीच्या प्रवासात काही भाविक म्हातारी माणसं तरुण चक्क आपल्या पाया पडतात. हिमालयातल्या त्या वाटेवर सगळे आपल्याला पुण्यात्मे समजतात.
आमचा वैयक्तिक अनुभव असा की ही यात्रा आपल्याने सहज शक्य होत नाही. तो परमेश्वरच आपल्याकडून ही एवढी कठीण खडतर यात्रा करून घेतो. दिवसातून शंभरदा मरण दिसत असतानाही केवळ भगवान शंकराच्या दर्शनाच्या ओढीने; त्याच्या प्रेरणेने सगळी शारीरिक दुःख विसरली जातात. कैलासाचं दर्शन ही पहिल्या दिवसापासून भावना असल्याने तिथे पोहोचेपर्यंतच्या मधल्या प्रवासाचे शारीरिक कष्ट जाणवले तरी परमेश्वराच्या नावापुढे ते विसरले जातात. कैलास-मानसच्या दर्शनाने जीवन सार्थकी झाल्याची अनुभूती येते.
आम्हाला प्रवासाचा खर्च दिल्ली ते दिल्ली ३६००० प्रत्येकी सांगण्यात आला होता; दिल्लीला पोहोचल्यावर तो ७५०० ने कमी झाला. कारण सरकारने मदत दिली. यावर्षी १९९७ तर हा खर्च फक्त रुपये पंचवीस हजार. हे गुजरात सरकार त्यांच्या यात्रेकरूंना दिल्लीला जाण्यायेण्याचा खर्च; दिल्लीत गुजरात भवनमध्ये नाममात्र भाड्याने राहायची सोय आणि प्रवासाचा यात्रेला प्रोत्साहन देतो. सरकारी कर्मचाऱ्यांना यात्रेसाठी रजा मंजूर केली जाते. फक्त यात्रेपुरता सुद्धा पासपोर्ट मिळतो. शारीरिक फिटनेस आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक असतात. भगवान शंकर सगळ्यांना सुख शांती देवो हीच प्रार्थना!
–
श्री. अविनाश शिरोडे
अभियंता | अंतराळ दूत